सर्दी – खोकल्यावर रामबाण उपाय असलेला घरगुती काढा

0
251
सर्दी – खोकल्यावर रामबाण उपाय असलेला घरगुती काढा | home remedies for cold and cough

थंडीच्या दिवसांमध्ये तापमान सतत चढत-उतरत असताना कितीही काळजी घेऊनही सर्दी किंवा खोकला होतोच. यासाठी जर वेळीच औषधोपचार केले गेले नाहीत, तर खोकला वाढत जाण्याची शक्यता असते. त्यातूनच मग घश्यामध्ये इन्फेक्शन, श्वास घेण्यास त्रास, सतत नाक बंद, घसादुखी, अश्या समस्या डोके वर काढू लागतात. बाजारामध्ये उपलब्ध असणारी औषधे घेतल्यानंतर तात्पुरते बरे वाटते, पण या औषधांमुळे काही ‘साईड इफेक्ट्स’, म्हणजे थोड्या फार प्रमाणात दुष्परिणामही जाणवू लागतात. सुस्ती वाटणे, सतत झोप येणे, तोंडाची चव जाणे, काहीही खाण्याची इच्छा न होणे अश्या प्रकारचे हे दुष्परिणाम असू शकतात. त्यामुळे अश्या प्रकारचे दुष्परिणाम संपूर्णपणे टाळण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्दी खोकला पूर्णपणे बरा होण्यासाठी घरच्या घरी काढा तयार करून त्याचे सेवन करता येऊ शकेल.
kadha1
हा काढा बनविण्यासाठी जे साहित्य वापरायचे आहे, ते घरीच सहज उपलब्ध असणारे आहे. या साठी दोन ग्लास पिण्याचे स्वच्छ पाणी, दोन ते तीन लवंगा, थोडे काळे मिरे, दोन ते तीन हिरवे वेलदोडे, काळ्या तुळशीची काही पाने, थोडे आले, चवीनुसार गूळ आणि थोडी चहाची पावडर या वस्तू आवश्यक आहेत. या काढ्यामध्ये घालण्यासाठी काळे मिरे, लवंगा, आणि वेलदोडे थोडेसे कुटून घ्यावेत, तसेच आले किसून घ्यावे. हा काढा तयार करण्यासाठी पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये कुटलेले काळे मिरे, लवंग, वेलदोडे, आले आणि गूळ घालावे. हे मिश्रण काही सेकंद उकळू दिल्यानंतर त्यामध्ये तुळशीची पाने घालावीत. त्यानंतर सर्वात शेवटी चहाची पूड यामध्ये घालून हे मिश्रण अर्धे राहीपर्यंत उकळत ठेवावे.
kadha2
काढा उकळून अर्धा झाल्यावर गॅस बंद करावा आणि हा काढा गाळून घ्यावा. हा काढा सेवन करण्यासाठी तयार आहे. हा काढा गरम असतानाच प्यावा. या काढ्याचे सेवन दररोज केल्याने काही दिवसातच सर्दी खोकला संपूर्ण बरा होतो. तसेच या काढ्याचे इतर कोणतेही दुष्परिणाम नसल्याने लहान मुलांना देण्यासाठी देखील हा काढा चांगला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here