पुणेरी पलटण चा ‘सुपर’ विजय

0
269

पुणे : संथ पण सावध खेळ करणाऱ्या पुणेरी पलटण संघाने प्रो-कबड्डी स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली दबंग संघावर 34-31 असा विजय मिळविला. सावध खेळण्याच्या नियोजनात अखेरच्या टप्प्यापर्यंत पिछाडीवर राहणाऱ्या पुणे संघाला राजेश मोंडल आणि कर्णधार दीपक हुडाच्या “सुपर रेड’ने विजयी केले.

आव्हान संपुष्टात आलेल्या दिल्ली दबंगवर एकतर्फी विजय मिळवेल असेच वाटले होते. प्रत्यक्षात मैदानावर दिल्लीने पुणे संघावर अनपेक्षित वर्चस्व राखले. अर्थात, पुणे संघाच्या सावधपणाचा दिल्लीने फायदा उचलला होता. दीपक हुडा अधिक काळ बाहेर राहील असे साधे सोपे नियोजन दिल्लीने राखले. पूर्वार्धात ते यशस्वी झाले. त्यामुळेच त्यांना विश्रांतीला 14-10 अशी आघाडी राखता आली होती. यथार्थ आणि विराज लांडगे यांच्या अचूक पकडींचा दिल्लीला आज बोनस लागला होता. पुणे संघ अखेरच्या टप्प्यापर्यंत निश्‍चित दडपणाखाली होते. मात्र, अखेरच्या पाच मिनिटात पुणे संघाने गिअर बदलला.

प्रथम राखीव म्हणून उतरलेल्या सुरेश कुमारने एका चढाईत दोन गडी टिपून मुसंडी मारण्यास सुरवात केली. त्यानंतर राजेश मोंडलने “सुपर रेड’ करत पुणे संघाला 24-24 असे बरोबरीत आणले. पुढच्या चढाईत दीपक हुडाने “सुपर रेड’ करत पुण्याची आघाडी 27-24 अशी वाढवली आणि नंतर मागे वळून बघितले नाही. पूर्वार्धात स्वीकारलेला लोण उत्तरार्धात मोक्‍याच्या वेळी अखेरच्या क्षणी परतवून लावत त्यांनी सामना हातात आणला. बचावात (6-9) असे मागे राहिल्यानंतरही चढाईतील (23-19) सातत्यपूर्ण वर्चस्वच पुणे संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. दीपकने दहा गुण मिळवून पुन्हा एकदा विजयात मोलाचा वाटा उचलला. दिल्लीकडून केवळ अबोफजलचे आठ गुण सर्वाधिक ठरले.

यू.पी.चे प्ले ऑफवर शिक्कामोर्तब
उर्वरित तीन सामने जिंकून प्ले-ऑफच्या आशा जिंवत ठेवण्याची बंगळूर बुल्सला चांगली संधी होती. त्यांनी यू. पी. योद्धाज विरुद्ध सुरवातही चांगली केली होती. आधीच्या सामन्यात प्रो मधील 28 गुणांचा विक्रम करणाऱ्या रिशांक देवाडिगाची कोंडी करून त्यांनी यू. पी. योद्धाजला दडपणाखाली ठेवले. पूर्वार्ध आणि उत्तरार्धात एकेक लोण चढवत त्यांनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात त्यांना सामना लावून धरण्यात अपयश आले. बचावात होणारी नाहक घाई आणि रोहितच्या पकडीमुळे त्यांनी मोठी आघाडी गमावली. अखेरचा मिनीट असताना बंगळूरने सात गुणांची आघाडी राखली होती. अखेरच्या चढाईला कोपरारक्षक रवी पहलने महेश गौडला पकडण्याची घाई करत गुण गमावला आणि हाच त्यांच्यासाठी घातक ठरला. बंगळूरने सामना 38-32 असा जिंकला. मात्र सातपेक्षा कमी फरकाने पराभव झाल्याचा एक महत्त्वपूर्ण गुण यू. पी. योद्धाज संघाला मिळाला आणि त्यांच्या प्ले-ऑफ प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.

अधिक माहितीसाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here