माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांचा भाजपा सदस्य पदाचा राजीनामा

पिंपरी : माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे त्यांनी राजीनामा पाठविला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठविले आहे.

संदीप कस्पटे यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या १२ वर्षांपासून पक्षाचे काम करित आहे. चिंचवड विधानसभेतील वाकड परिसरात पक्षाचे काम सुरू करणारा मी पहिता कार्यकर्ता आहे. वाकड परीसरात गेली वीस वर्षे सामाजिक कार्य करीत आहे. त्यामुळे मला माझी ताकद माहित आहे. २०१७ मधे झालेल्या महापालिका निवडणुकीत मी चांगल्या बहुमताने विजयी झालो व सोबत माझ्या प्रभागातील सर्व उमेदवार मी निवडून आणले. राज्यात पक्ष कठीण परीस्थितीतून वाटचाल करीत आहे आणि अशा काळात माझ्या सारख्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना जबाबदारी द्यायचे सोडून सापत्न वागणूक देणे व ताकतवर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून सुरू आहे, जो पक्ष संघटनेसाठी अत्यंत घातक आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप यांच्यासाठी मी व माझ्या सारख्या अनेक नगरसेवक कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून आपापल्या प्रभागात मताधिक्य दिले.

पक्षाने भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांना बसविले परंतु पक्षाची कार्यकारिणी करताना त्यांनी ताकतवर माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना जाणून-बुजून बाजूला ठेवले. त्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्वाच्या जबाबदा-या दिल्या. पक्षाने मला स्वाभिमान शिकवला आहे. कुणाच्या ताटाखालचे मांजर मी होऊ शकत नाही. चिंचवड विधानसभेत पक्षात कुठेही लोकशाही नाही फक्त घराणेशाही आहे. माझ्यासारखे अनेक माजी नगरसेवक  घराणेशाहीला, यांच्या हुकुमशाहीला कंटाळले आहेत. मी शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीला वैतागून भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आणखी १५ माजी नगरसेवक पदाधिकारी राजीनाम देण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे चार सदस्यांचे पॅनल विजयी झाले होते. त्यात कस्पटे यांच्यासह आरती चोंधे, ममता गायकवाड, तुषार कामठे हे पॅनलमध्ये विजयी झाले होते. त्यापैकी कामठे यांनी पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. त्यांच्यापाठोपाठ संदीप कस्पटे यांनी भाजप सोडल्याने वाकड, रहाटणी, काळेवाडी पट्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

See also  ‘जिल्हा न्यायालय-स्वारगेट भुयारी मेट्रोमार्ग काही दिवसांतच पुणेकरांच्या सेवेत’ स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाचेही त्याचवेळी भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती