विद्यार्थ्यांनी नेटवर्क विकसित करून टीमवर्क मध्ये काम करावे – डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा

पिंपरी, पुणे : ऑनलाइन चा वापर आता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यामुळे संसाधने, श्रम, वेळ, पैसा याची बचत होऊन विक्री व नफ्यामध्ये मोठी वाढ होते. परंतु याचा सुरक्षितपणे वापर करण्यासाठी सायबर सुरक्षितते विषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. या माहितीजाला मध्ये खरे आणि खोटे ओळखता आले पाहिजे. यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने आयोजित केलेली स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयोगी ठरेल. विद्यार्थ्यांनी मजबूत नेटवर्क विकसित करून टीमवर्क मध्ये काम केले पाहिजे. सायबर सुरक्षा ही मूलभूतपणे एक सहयोगी स्वयंशिस्त आहे असे प्रतिपादन सायबर सुरक्षा सहकार्य अध्यक्ष आणि आयक्यूएसएसचे सीईओ डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा यांनी केले.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) साते, वडगाव मावळ, पुणे येथे स्कूल ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन्सच्या सायबर सुरक्षा क्लब अंतर्गत भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीय स्तरावरील अंतर महाविद्यालयीन “क्रेस्ट २०२६ – सीटीएफ कॅप्चर द फ्लॅग” ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देशभरातील २००० पेक्षा अधिक आयआयटी, एनआयटी आणि सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटीचे संस्थापक सीईओ डॉ. रोहित गौतम, पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटी कंपनीच्या सीईओ डॉ. शिफा सायकलवाला, कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी आणि एचओडी डॉ. कमलेश मेश्राम आदी उपस्थित होते.

डॉ. शिफा सायकलवाला यांनी सांगितले की, सायबर सुरक्षेत महिलांचा सहभाग अधिक गरजेचा आहे. यामध्ये महिलांना मोठी संधी आहे. त्यांनी आता नेतृत्व करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. त्यासाठी सक्षम भूमिका घ्यावी आणि अशा विशाल व्यासपीठावर सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. हे व्यासपीठ केवळ महाविद्यालयीन स्पर्धांपुरते मर्यादित नसून प्लेसमेंट, मशीन टेस्ट, सायबर डिफेन्स भूमिका आणि राष्ट्रीय सुरक्षा मोहिमांसाठी मोठी संधी आहे.

पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे म्हणाले की, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सातत्याने कौशल्य विकास करण्याचे आवश्यक आहे. प्र. कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी वेगाने बदलणाऱ्या डिजिटल जगात विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन केले.

See also  पी एम पी एल च्या धडकेत सात गाई जागेवरच गतप्राण तर सात गंभीर जखमीःकोंढणपूर येथील घटना

हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटीचे संस्थापक सीईओ डॉ. रोहित गौतम यांनी सायबरस्पेसचा जबाबदारीने वापर केला पाहिजे. भारताच्या वाढत्या डिजिटल लँडस्केपला संबोधित करताना, त्यांनी उत्कटतेचे ध्येयात रूपांतर करण्याची गरज व्यक्त केली. सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण समुदायांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने प्रोजेक्ट दुर्गा सारख्या उपक्रम राबविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. सुरक्षित डिजिटल भारत सुनिश्चित करण्यासाठी सायबर सुरक्षा जागरूकता प्रत्येक गावात पोहोचली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जावेत असेही त्यांनी सांगितले.

डॉ. कमलेश मेश्राम म्हणाले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये “क्रेस्ट २०२६ – सीटीएफ” अशा स्पर्धा, प्रदर्शन आणि उद्योग सहकार्याद्वारे एक मजबूत सायबर सुरक्षा मार्गदर्शन मंच कार्यरत राहील.पीसीयू विद्यार्थी प्रज्वल पवार, सोहम आहेर, गणेश रामावत, अथर्व जगदाळे, कौस्तुभ पाटील, कैफ तरसगर, ऋतुजा खोबरे आणि वैष्णवी शेट्टी यांनी सीटीएफ चॅलेंजेसचे डिझाईन, डेव्हलपमेंट, डिप्लॉयमेंट आणि कठोर चाचणी यामध्ये उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य दाखवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे स्पर्धेसाठी सुरक्षित, सक्षम आणि राष्ट्रीय स्तराच्या मानकानुसार व्यावसायिक दर्जाचे प्लॅटफॉर्म तयार करण्यात यश आले. समन्वयक म्हणून डॉ. स्नेहांकिता मजलेकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
प्रथम क्रमांक :– घोष्ट बटालियन टीम, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, वाघोली, पुणे; द्वितीय क्रमांक :- चक्रव्हू टीम, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, वाघोली, पुणे; तृतीय क्रमांक :- नेट सेल्युथ टीम, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे;
चतुर्थ क्रमांक :- रेड फॉक्स टीम, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे आणि पाचवा क्रमांक :- डायस्थोपियन डिबगर्स टीम, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी, पुणे या विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि एकूण सहा लाख रुपयांची बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्पर्धक विजेत्यांचे आणि मार्गदर्शक, आयोजकांचे अभिनंदन केले.