भारत जोडोनंतर आता आषाढी वारी?
राहुल गांधी करणार ‘विठू नामाचा’ गजर
माळशिरस ते वेळापूर वारीत सहभागी होणार

अकलूज / सूर्यकांत भिसे – लोकसभेतील विरोधी पक्षनेते ना .राहुल गांधी यंदा आषाढी वारीत  सहभागी होणार असल्याची माहिती पुढे आली असून ते माउलींच्या पालखी सोहळ्यात  माळशिरस ते वेळापूर हा १८ किलोमिटरचा टप्पा चालणार आहेत .

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यंदाच्या आषाढी वारीत  सहभागी होणार आहेत. ते ७ जुलै रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभाही होणार आहेत. अशातच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते ना .राहुल गांधी देखील या वारीत सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे प्लॅनिंग असल्याचे सांगितले जात आहे.

भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा या माध्यमातून राहुल गांधींनी देशभर दौरा केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातही अनेक सभाही घेतल्या. त्यानंतर आता राहुल गांधी पंढरीच्या वारीत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आषाढी वारीला येणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 13 जागा जिंकल्या असून आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर राहुल गांधींनी वारीत सहभाग घेतला तर त्याचा फायदा काँग्रेसला निवडणुकीत होऊ शकतो.

‘या’ दिवशी होणार वारीत सहभागी
दरम्यान, पंढरीच्या वारीत महाराष्ट्रासह देशभरातून लाखो  भाविक सहभागी होतात. दरवर्षी बारा लाखांहून अधिक भाविक आषाढी वारीत सामील होतात. सुमारे महिनाभरापासून महाराष्ट्रातील गावखेड्यातील नागरीक आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या वारीत आता राहुल गांधी सामील होणार आहेत. ते 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. तत्पुर्वी ते दि . १३ रोजी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात माळशिरस येथे सहभागी होणार असून माळशिरस ते वेळापुर हे सुमारे १८ किलोमिटरचे अंतर पायी चालणार असल्याचे वृत्त आहे .

वारीत चालण्याची राजकारण्याची परंपरा
पंढरीच्या वारीत चालण्याची राजकारण्यांची जुनी परंपरा असून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी , उपमुख्यमंत्री आर . आर . पाटील , सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार ,  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे , आरोग्य मंत्री राजेश टोपे ,  ग्रामविकास मंत्री आण्णासाहेब डांगे , वनमंत्री बबनराव पाचपुते , खा . सुप्रिया सुळे , खा संजय जाधव यांच्यासह अनेक आमदार व लोकप्रतिनीधी वारीत काही टप्पे चालले आहेत व वारीचा आनंद घेतला आहे . त्याच पावलावर पाउल ठेवुन देशाचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी वारीत चालणार आहेत .

यानंतर आषाढी वारीतही त्यांनी सहभागी व्हावं यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे माळशिरस ते वेळापूर या दरम्यान, राहुल गांधी प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकतात.

See also  खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नियुक्तीनंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून "अभिवादन यात्रा"