खडकवासला : पार्टीसाठी जमलेल्या चार-पाच जणांच्या मित्रांकडून एका मित्राचा डोक्यात गोळी घालून हत्या केल्याची घटना खडकवासल्यातील कोल्हेवाडी येथे घडली असून हत्या झालेल्या तरुणाचा मृतदेह डोणजे (ता. हवेली) येथील पानशेत रस्त्यावरील पुलाखाली फेकण्यात आला आहे.मंगळवारी रात्री ही घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पुणे महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे आचारसंहिता नुकतीच जाहीर झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.विशाल संजय चव्हाण (वय. 25, रा. कोल्हेवाडी किरकटवाडी, ता हवेली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून डोक्यात गोळी घालून हत्या झाल्याचा अंदाज ग्रामीण पोलिसांनी वर्तवला आहे. पानशेत रस्त्यावरील डोणजे गावच्या हद्दीतील पुलाखाली मृतदेहाची पडल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याच्याअधिकारी पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष तोडकर, पोलीस हवालदार संतोष भापकर यांच्यासह तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान हत्या नेमकी कोणी व काय कारणासाठी केली?
याची माहिती अद्याप समोर आली नसून किरकोळ वादातून हत्या झाली असल्याचा संशय पुणे ग्रामीण पोलीस अप्पर अधीक्षक रमेश चोपडे यांनी व्यक्त केला आहे. त्याच्यावर पूर्वी काही गुन्हे दाखल असून त्या संदर्भानेही तपास होईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान घटना नांदेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हेवाडीत घडली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे शहर पोलीस दलातील झोन तीनचे उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. नांदेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव पुढील तपास करत आहेत.
पाच ते सात मित्र मित्रांमध्ये चालू असलेल्या ओल्या पार्टीमध्ये किरकोळ कारणातून वेपन बाळगून असलेले एका मित्राने केलेल्या गोळीबारात सदर हत्या झाली असून पार्टीतील संशयित यांची नावे ही निष्पन्न झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
– संभाजी कदम, उप आयुक्त झोन तीन
























