नवरात्रोत्सवात कीर्तिशक्ती फाउंडेशनतर्फे अनोखे सरस्वती पूजन!
बालेवाडीतील पीएमसी शाळा क्र. १५२ (ब) च्या वाचनालयासाठी पुस्तकांची भेट

बाणेर : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून कीर्तिशक्ती फाउंडेशन, बाणेर यांच्या वतीने बालेवाडी येथील पीएमसी शाळा क्र. १५२ (ब) च्या वाचनालयासाठी विविध विषयांवरील पुस्तकांची भेट देण्यात आली. पुस्तकभेटीतून ज्ञानाचा जागर घडविणाऱ्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.

या पुस्तकभेटीत मराठी साहित्य, लोकसाहित्य, महान व्यक्तिमत्त्वे, आत्मचरित्रे, बाल व किशोर साहित्य, भूगोल, कविता आणि कथासंग्रह अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची संधी मिळणार असून, त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास आणि शैक्षणिक प्रगतीस मदत होणार आहे.

यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थी तसेच शिक्षकांचा पुस्तकभेट देऊन सन्मान करण्यात आला. फाउंडेशनच्या संस्थापक सौ. कल्याणी टोकेकर यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

या उपक्रमासाठी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. शोभा घोरपडे, मुख्याध्यापिका सौ. मनीषा केडकर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष सहकार्य केले. फाउंडेशनतर्फे सौ. शिखा नीखरा, सौ. अंशिका राय आणि श्री. अभय बागल यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवून त्यांना ज्ञानसमृद्ध करण्याच्या दृष्टीने कीर्तिशक्ती फाउंडेशनचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

See also  सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेने कार्य करून जीवनात यशस्वी व्हा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सिम्बायोसिस विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न