तीर्थ टॉवर्सची पालिकेने पाडलेली कंपाउंड भिंत पुन्हा बांधा; रहिवाशांचा पत्रकार परिषदेत एल्गार

पुणे : सुस परिसरातील तीर्थ टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची पाडण्यात आलेली कंपाउंड भिंत पुन्हा बांधून द्यावी आणि रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे. यासाठी सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने गुरुवारी (दि. २९) पुण्यातील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

सोसायटीची संरक्षक भिंत पाडण्यात आल्याने परिसरातील शेकडो कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या संदर्भात संबंधित प्रशासन आणि पुणे महानगरपालिकेकडे (पीएमसी) वारंवार पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा दावा रहिवाशांनी केला. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली.

भिंतीची पुनर्बांधणी आणि दोषींवर कारवाईची मागणी
पाडण्यात आलेली कंपाउंड भिंत तातडीने पुन्हा बांधून द्यावी, तसेच भिंत पाडण्यास जबाबदार असलेल्यांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. सोसायटीमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास असल्याने संरक्षक भिंत नसणे ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सोसायटीच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका व्यवस्थापन समितीने मांडली. या प्रश्नावर रहिवाशांनी एकजूट दाखवत आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने भिंतीच्या पुनर्बांधणीसह रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा तीर्थ टॉवर्सच्या व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे.

See also  मुख्यमंत्री महोदय हाच आहे का निःपक्षपाती पणा.... कोथरूड मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधाचे बॅनर