पुणे : दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्ता असणाऱ्या आम आदमी पार्टीने आता पुण्यामधल्या निवडणुकीसाठी आपले निर्धारपत्र जाहीर करताना आप च्या उत्तम शाळा, आरोग्य सुविधा आणि मोफत बस प्रवास या पंजाब दिल्ली मॉडेलची आठवण करून दिली. याची ‘नक्कल नको, अस्सल आणा’ ‘गैरकारभाराकडून जबाबदार भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाकडे जाण्यासाठी बदल घडवूया’ असे आवाहन पुणेकरांना केले आहे. पुण्यामध्ये आम आदमी पार्टी चे ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील बहुतेक सर्व कार्यकर्ते हे सुशिक्षित युवक वर्गातील आहेत. अनेक नागरी मुद्द्यांना हात घालणारे निर्धारपत्र आज आम आदमी पार्टी तर्फे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी पुण्यात पत्रकार भवन येथे जाहीर केले.
पुणेकरांसाठी आर्थिक संपन्नता देणारे म्हणजेच दरडोई उत्पन्न वाढवणारे रोजगार उपलब्ध करणारे आणि सुविधांच्या पुढे जात धोरणात्मक निर्णय घेतले जातील तसेच महिलांना मोफत बस प्रवास हा दिल्ली पंजाबच्या धर्तीवर दिला जाईल असे म्हटले आहे. पुणेकरांसाठी कमाल 30 मिनिटात ऑफिस आणि तीस मिनिटात घरी परत अशी वेळेची, इंधनाची, मानसिक शारीरिक दमछाक थांबवणाऱ्या वाहतूक कोंडी मुक्त शहरासाठी मिसिंग लिंक रोड आधुनिक तंत्रज्ञान वापर केला जाईल.
सर्व सरकारी शाळा या उच्च दर्जाच्या सुविधा व माफक दरात शिक्षण देणाऱ्या, खाजगी शाळांच्या तोडीच्या बनवू. पाचशे मीटर अंतरामध्ये मोफत प्राथमिक आरोग्य सुविधा देणारे मोहल्ला क्लिनिक तसेच महापालिका तुमच्या दारात या योजनेअंतर्गत नागरिकांना कागदपत्रे पारदर्शी पद्धतीने घरपोच दिले जातील. प्रत्येक घराला पुरेसे पाणी व सामाविष्ट गावात मूलभूत सुविधांना प्राथमिकता देत रस्ते,पाणी यावर वाढीव निधी खर्च केला जाईल. प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली जातील आणि भयमुक्त शहर होण्यासाठी विविध उपाय योजना राबवण्यात येतील असेही मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पुणेकरांच्या समस्यांची यादी वाचत भाजप राष्ट्रवादी युतीवर टीका केली. नागरिकांच्या करातून जमा होणारा पैसा हा योग्य ठिकाणी, पारदर्शी पद्धतीने खर्च केला जाईल असे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महिला अध्यक्ष सुरेखा भोसले, महासचिव अक्षय शिंदे, सुभाष कारंडे, सुनील सवदी आदी उपस्थित होते.
























