धायरी  गावचे ग्रामदैवत श्री. कालभैरवनाथाची यात्रा उत्साहात,
निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे नियोजन

धायरी : सिंहगड रस्त्यावरील धायरी गावचे ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथ देवाची यात्रा उत्साहात पार पडली. उत्सवनिमित्त निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे नियोजन करण्यात आले. क्रमांक एक साठी  कै. सोपानदादा पोकळे यांच्या स्मरणार्थ अनिल पोकळे व सुनील पोकळे यांच्यावतीने चांदीची गदा व रोख रक्कम ठेवण्यात आली . यावेळी मानाच्या चांदीच्या गदेसाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील  विरुध्द उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे  यांच्यात अटीतटीची लढत झाली. दीड दोन तास चाललेल्या या कुस्तीमध्ये दोन्ही पैलवांनापैकी कोणीही विजयी न झाल्याने अखेरची कुस्ती बरोबरीत सोडवत इनामाची रक्कम दोघांमध्ये दिली. रात्री १२ वाजेपर्यंत चाललेल्या या  कुस्तिआखाड्यात ५० हून अधिक कुस्ती सामने निकाली पार पडले. सर्व विजेत्या पैलवानांना रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले.

यावेळी किशोर पोकळे, उत्सव समितीचे अध्यक्ष तुषार पोकळे, उपाध्यक्ष शिवराज चव्हाण, अनिल पोकळे, राजेश पोकळे, रोहित लायगुडे, सोमेश्वर वाकचौरे, कृष्णा पोकळे, बापूसाहेब पोकळे  आदींसह ग्रामस्थ तरुण कार्यकर्त्यांनी आखाड्याचे संयोजन केले. 
मंगळवारी २४ मार्च  रोजी श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या उत्सवास हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपारिक रिवाजात सुरुवात झाली. देवस्थान , उत्सव समीतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते  अभिषेक करण्यात आला. महापुजा व  आरती होऊन उत्सवास प्रारंभ झाला. दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी  अलोट गर्दी केली होती. मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला. देवस्थानचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, उपाध्यक्ष सुनिल  पोकळे, सचिव पंढरीनाथ पोकळे, खजिनदार गुलाब पोकळे, पद्माकर लायगुडे, किशोर आदींसह सर्व धायरी ग्रामस्थांनी, देवस्थान ट्रस्ट व उत्सव समितीने यावेळी उत्कृष्ट नियोजन केले.

See also  करदात्यांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन