पुणे : कात्रज चौक ते पिसोळी दरम्यान प्रस्तावित ८४ मीटर विकास योजनेअंतर्गत ५० मीटर रस्त्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, दोन दिवसांत १०९ पैकी ४८ मिळकतींचा ताबा पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. या प्रक्रियेमुळे कात्रज उड्डाणपूल प्रकल्प पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
कात्रज-कोंढवा परिसरातील भूसंपादन सुरू असलेल्या ठिकाणी महापौर मंजुषा नागपुरे तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.
मौजे कात्रज व मौजे कोंढवा येथील रस्ते विकास योजनेसाठी सुमारे ४१ हजार चौ.मी. क्षेत्राचा निवाडा विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक १५, पुणे यांच्या मार्फत २७ एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता. या भूसंपादनासाठी पुणे महानगरपालिकेने शासनाकडे सुमारे १९७ कोटी रुपये जमा केले आहेत. निवाड्यानंतर संबंधितांना पंधरा दिवसांची नोटीस देण्यात आली असून १४ मे २०२६ पासून प्रत्यक्ष ताबा घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत जवळपास २५ हजार चौ.मी. क्षेत्र मनपाच्या ताब्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) सुरू असलेल्या कात्रज उड्डाणपूलाच्या उतरणीसाठी आवश्यक जागेचाही ताबा घेण्यात आला असून त्या ठिकाणी पथ विभागाने काम सुरू केले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, प्रभाग समिती अध्यक्षा रंजनाताई टिळेकर, नगरसेविका अर्चना जगताप, पुजा कदम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अजित बांबळे, भूसंपादन अधिकारी श्वेता दारुणकर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















