आग्रा : निमगाव म्हाळुंगी व तळेगाव ढमढेरे येथील महिला भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा निमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यास भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना भावपूर्ण मानवंदना अर्पण केली. लाल किल्ल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. या प्रसंगी संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.महिलांचा उत्साह, शिवरायांप्रती असलेली निस्सीम श्रद्धा आणि घोषणांमधील जाज्वल्य स्वाभिमान पाहून तेथील स्थानिक नागरिकही भारावून गेले. अनेकांनी थांबून या क्षणांचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले, तर काहीजण अभिमानाने म्हणत होते, “किती अभिमान आहे आपल्या राजाबद्दल या महिलांना!.
याच आग्रा किल्ल्यात औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले होते. तसेच औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा अपमान करण्यात आला होता*. *महाराजांना ज्या ठिकाणी दरबारात उभे करण्यात आले होते, त्या ऐतिहासिक स्थळालाही महिलांनी भेट दिली. त्या ठिकाणी उभे राहताच अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वराज्यासाठी संघर्ष करणाऱ्या शिवरायांच्या स्वाभिमानाची गाथा पुन्हा जिवंत झाली.
शिवरायांच्या शौर्य, राष्ट्रप्रेम, स्त्रीसन्मान आणि लोककल्याणकारी विचारांचे स्मरण करत महिलांनी त्यांना अभिवादन केले.”ज्यांनी स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले, त्या राजांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या भूमीवर येण्याचे भाग्य लाभले, हा आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे,” अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या.
या ऐतिहासिक व प्रेरणादायी दौऱ्याचे आयोजन निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच बापूसाहेब काळे यांनी केले होते. स्वराज्याचा इतिहास, शिवचरित्राची प्रेरणा आणि महाराष्ट्राचा गौरव देशभर पोहोचावा या भावनेतून त्यांनी हा उपक्रम राबविला.
आग्र्याच्या भूमीत घुमलेला शिवरायांचा जयघोष, महिलांच्या डोळ्यांतील अभिमान आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेले कौतुक हे क्षण उपस्थितांच्या स्मरणात कायम राहतील. हा दौरा केवळ पर्यटन नसून स्वराज्याच्या इतिहासाशी जोडणारी एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभूती ठरला.
या दौऱ्यासाठी निमगाव म्हाळुंगीचे उपसरपंच तनुजा विधाटे, माजी उपसरपंच भरत विधाटे, सुप्रिया ढमढेरे, पद्मजा नानगुडे, रेखा महाजन यांच्यासह या दौऱ्यातील अनेक महिलांनी सहकार्य केले या दौऱ्यासाठी अनिल गुंजाळ, आनंदा जायकर,महादू नरके, सुनील बोकले यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच या दौऱ्याला हभप गजानन महाराज इंगोले, प्रसिद्ध कीर्तनकार आत्माराम महाराज शास्त्री, हभप दत्तात्रय महाराज अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली या दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे या दौऱ्याचे आयोजक निमगाव म्हाळुंगी चे माजी सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितले.
















