पुणे, दि. ११ जून : NEET-UG, CBSE तसेच विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि मूल्यांकनातील त्रुटींविरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठे आंदोलन करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, ही आंदोलनाची प्रमुख मागणी होती.
दुपारी चार वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून विद्यार्थी, युवक आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यापीठ परिसरात हजारो आंदोलक जमा झाल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती.
CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलनाला संबोधित करताना, “एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला असून त्यासाठी जबाबदार असलेल्या शिक्षणमंत्र्यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे,” असा आरोप केला. त्यांनी देशभर आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचाही इशारा दिला.
सामाजिक कार्यकर्ते Sonam Wangchuk यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित शिक्षण जाहीरनाम्याचेही अनावरण करण्यात आले.आंदोलनकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, पेपरफुटी प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई, राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसह विद्यार्थ्यांच्या भवितव्याची हमी देण्याची मागणी केली. आंदोलकांच्या हातात विविध फलक आणि घोषणाबाजीमुळे विद्यापीठ परिसराचे वातावरण आंदोलनमय झाले होते.
CJP ने पुण्यानंतर लखनऊ, अमृतसर, हैदराबाद, जयपूर आदी शहरांमध्ये आंदोलनाची मालिका सुरू ठेवण्याची घोषणा केली असून मागण्या मान्य न झाल्यास २० जूनपासून नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
















