पुणे : पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे, मुळा-मुठा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी मंजूर करण्यात आलेले टेंडर तसेच सिंहगड रोड परिसरातील पूरस्थितीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पुणे महानगरपालिकेत आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला पुणे महानगरपालिकेतील पक्षाचे गटनेते काकासाहेब चव्हाण, नगरसेवक गफूर पठाण, नगरसेविका अनिता इंगळे, महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षा स्वाती पोकळे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्रीकांत पाटील यांनी पुणेकरांना सध्या अनेक गंभीर नागरी समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केला. शहरातील जवळपास सर्वच भागांतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या समस्यांकडे प्रशासन आणि सत्ताधारी भाजपकडून दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी म्हटले.
जलपर्णीच्या टेंडरवरून सवाल
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुळा-मुठा नदीपात्रात करण्यात आला. या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीपात्रातील मोठ्या प्रमाणातील जलपर्णी वाहून गेल्याचा दावा श्रीकांत पाटील यांनी केला.
असे असताना अवघ्या चार दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत जलपर्णी काढण्यासाठीच्या टेंडरला मंजुरी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. जलपर्णी वाहून गेल्यानंतरही तिच्या काढण्यासाठी टेंडर काढून सार्वजनिक पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे सांगत हे मंजूर टेंडर तातडीने रद्द करावे आणि संपूर्ण टेंडर प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सिंहगड रोडवरील एकतानगरीसह नदीपात्रालगतच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडत असल्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. दरवर्षी पावसाळ्यात या भागातील नागरिकांना घरात पाणी शिरण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेसह जीविताच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पूरस्थितीची समस्या दरवर्षी उद्भवत असूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे पाटील म्हणाले. नदीपात्र, नाले, पूररेषा, पाण्याचा प्रवाह आणि जलनिस्सारण व्यवस्थेचा शास्त्रीय अभ्यास करून ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
एकतानगरीसह पूरग्रस्त भागातील नागरिकांना पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याच्या समस्येतून कायमस्वरूपी मुक्त करावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाची दखल सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही श्रीकांत पाटील यांनी दिला.
















