‘पालिका आणखी किती अपघातांची वाट पाहणार?’ महाळुंगेतील खड्डे आणि साईड कटमुळे अपघातांचा धोका

महाळुंगे : महाळुंगे पाण्याच्या टाकीजवळील सुनीलनगर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, ठिकठिकाणी निर्माण झालेले साईड कटही अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असून काही आठवड्यांपूर्वी झालेल्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रस्त्यावरील खड्डे आणि साईड कटमुळे वाहनचालकांना वाहनांचा ताबा राखणे कठीण होत आहे. विशेषतः दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या परिसरातील खड्डे तातडीने बुजवावेत तसेच धोकादायक साईड कटची दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. रस्त्यावरील खड्डे चुकवण्यासाठी वाहनांना वारंवार वाकडे-तिकडे वळावे लागत असल्याने वाहनांमधील लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महाळुंगे गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर मूलभूत सुविधा आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना सातत्याने पाठपुरावा करावा लागत असल्याची नाराजीही व्यक्त होत आहे. समाविष्ट गावांमधील रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी व आवश्यक देखभाल मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन सुनीलनगर परिसरातील खड्डे बुजवावेत, साईड कट दुरुस्त करावेत आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक लक्षात घेऊन रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

See also  इतिहास आणि संस्कृती समजून घेण्याच्या दृष्टीने वाचन व प्रवास महत्वाचा – डॉ. आशुतोष जावडेकर