पाषाण : बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेविका सौ. मयुरीताई राहुल कोकाटे यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वाकड ब्रिज ते सुसखिंड ब्रिजदरम्यान बाणेर परिसरातील सर्व्हिस रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासह पावसाळी वाहिन्या, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या कामांबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख राजेश बनकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रतिनिधी तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व्हिस रस्त्याचे काम करताना पावसाळी वाहिन्या, ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा लाईन, विद्युत वाहिन्या आणि अन्य युटिलिटींची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. भविष्यात रस्ता खोदण्याची वेळ येऊ नये आणि नागरिकांना वारंवार गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काँक्रिटीकरण केले आहे, त्या ठिकाणच्या भूमिगत सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करण्याबाबतही चर्चा झाली.
ननवरे ब्रिज आणि बिटवाईज चौक येथील नाल्यांवरील कल्व्हर्टची कामे पुढील १५ दिवसांत विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पॅन कार्ड क्लब रोड परिसरात डोंगर उतारावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा नाल्यांमधून योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बाणेर-बालेवाडीत अतिक्रमणांवर कारवाई
बाणेर-बालेवाडी परिसरातील इमारतींच्या रूफटॉप, फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमणांवर बांधकाम विभागाने अतिक्रमण विभागाच्या समन्वयाने तातडीने कारवाई करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
स्थायी समिती सदस्य नगरसेविका मयुरी कोकाटे आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. या वेळी भाजपचे उपाध्यक्ष राहुल कोकाटे, NHAI चे हायवे इंजिनिअर अनंत कुलकर्णी, विनोदराज पाटील, बांधकाम विभागाचे मुकुंद बर्वे, उमेश सिद्रुक आणि ड्रेनेज विभागाचे श्री. तांदळे उपस्थित होते.
सर्व्हिस रस्ता, पावसाळी पाण्याचा निचरा आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांवर संबंधित विभागांनी समन्वयाने काम केल्यास बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.















