गोकुळच्या दणक्यानंतर भाजप पुन्हा आपटी खाणार का?

पुणे( विशेष प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे आता लक्ष लागलेले आहे. विशेषतः गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस च्या सतेज पाटील यांनी भाजप महायुतीचा पराभव केला. त्याचीच पुनरावृत्ती पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडेल, अशी चर्चा जोर धरत आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातले होते. भाजपच्या या फौजफाट्यासमोर काँग्रेस पक्षाचे सतेज पाटील ठामपणे एकटे उभे राहिले, त्यांनी कडवी झुंज दिली आणि महायुतीला अस्मान दाखविले, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपविरोधी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघातील जेन झी मतदार भाजपला पराभूत करतील, असा दावा महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात दै.पुढारी ने सातत्याने विरोधात भूमिका घेतली. २०१४ सालापासून दै.पुढारीने पंतप्रधान मोदी यांचे समर्थन केले. पंतप्रधान मोदी यांनी ‘पुढारी’च्या आधुनिक यंत्रणेचे उदघाटन केले होते. त्यानंतर फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्मच्या काळात भाजप उमेदवार स्मिता जाधव यांचे पती, दै.पुढारीचे संचालक योगेश जाधव यांना उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता. जाधव घराण्याची ही राजकीय पार्श्वभूमी पहाता शरद पवार गट एकजुटीने आणि प्रखरपणे पदवीधर मतदारसंघात सामना करेल. जाधव घराणे पहिल्यांदाच राजकारणात उघडपणे पवार यांच्या पक्षासमोर उभे राहिले आहे. ही बाजू पहाता जाधव आणि पवारांच्या पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव हा सामना लक्षवेधी झालेला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ.स्मिता योगेश जाधव (भाजप), हर्षदा देशमुख -जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), सुनील मोदी (शिवसेना ठाकरे गट), प्रा.सचिन सानप (अपक्ष), असे प्रमुख चर्चेतील उमेदवार आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच एकोपा राहिलेला नाही. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे जयंत दिनकर आसगावकर आणि भाजपचे कौस्तुभ मुरलीधर गावडे असे प्रमुख उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने गेली दोन वर्षे मतदारसंघात बांधणी केली होती. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत होता. परंतु महायुतीच्या जागा वाटपात भाजपने या जागेवर दावा सांगितला आणि ही जागा भाजपला मिळाली. या घडामोडींमुळे चिवटे यांचे समर्थक भाजपवर नाराज झाले आहेत. त्या नाराजीचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होईल का? अशी चर्चा आहे.

गोकुळ च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी दमदारपणे झुंज देऊन यश खेचून आणले. तोच जोश काँग्रेस आणि मित्र पक्षांमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यातूनच पुण्यातील या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या दोन निवडणुका इंटरेस्टिंग झालेल्या आहेत. सतेज पाटील यांच्या कामगिरीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जेन झी मतदारांच्या हाती ही निवडणूक गेलेली आहे.

See also  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा...

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये झालेले एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन यामध्ये प्रमुख्याने सरकारने विलंबाने घेतलेली भूमिका यामुळे सुशिक्षित वर्गामध्ये काहीशी नाराजी असल्याचा सूर देखील अनेकदा पाहायला मिळत आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिकीट वाटपावरून झालेली नाराजी व कुरघोडीचे राजकारण यामुळे देखील दुखावलेले सत्तेतील कार्यकर्ते यामुळे भाजपाच्या संघर्षामध्ये अधिक वाढ झालेली दिसून येत आहे.

२३ ऑक्टोबर रोजी या निवडणुकांसाठीचे मतदान होणार आहे. यावेळी सुशिक्षित मतदार तसेच देशाचे भविष्य घडवणारे शिक्षक मतदार कोणत्या मुद्द्यांवर प्रभावित होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.