पिंपरी चिंचवड महानगरपालिका विकासाच्या नावाखाली मुळानदी पात्रातील जैवविविधतेचा गळा घोटतेय

पुणे : पिंपळे निलख येथील विशाल नगर परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या मुळा नदी पात्रातील विकास कामांच्या मुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच नदीपात्रातील जैवविविधतेचा गळा घोटत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नदी सुधार योजना प्रकल्प राबवण्यासाठी २०० कोटी हुन रुपयांची विकासकामे करण्यात येत आहेत. परंतु या विकास कामांमुळे नदी पात्रातील व काठावरील जैवविविधता धोक्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकल्पासाठी सर्व मान्यता पाटबंधारे विभाग, पर्यावरण विभाग यांनी सहज उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुळा नदी पात्रालगत संरक्षण भिंत, जॉगिंग ट्रॅक अशा अनेक सुविधांच्या नावाखाली या परिसरातील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरील जैवविविधता नष्ट करण्यात आली आहे. मुळा नदी काठावरील हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. तर ठेकेदारामार्फत नदीच्या प्रवाहामध्ये खोदकाम करून भिंत टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच खोदकामातील राडाराडा नदीपात्रात सर्रास टाकला जात असल्याने नदीपात्र मुजवण्याचा देखील धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पामुळे बाणेर बालेवाडी व पिंपळे निलख परिसरामध्ये मुळा नदीचे पात्र सुमारे 30 ते 40 टक्क्याने मुजवले जाणार असून यामुळे या परिसरात पुराचा धोका देखील निर्माण झाला आहे.

केंद्र व राज्य सरकार तसेच महानगरपालिका यांचा निधी जिरवण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास करणारा हा उपक्रम पिंपरी चिंचवड कर यांच्या माथी प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आला आहे. या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून विरोध दर्शवला जात आहे. तर पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका दोन्ही हद्दीमध्ये पुराचा धोका निर्माण होणार असल्याने हा प्रकल्प थांबवण्यात यावा व टाकलेला राडारोडा उचलण्यात यावा अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, नदी स्वच्छता व सुधारणा प्रकल्प झाले पाहिजेत परंतु नदी सुधारणा प्रकल्पाच्या नावाखाली महानगरपालिका पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. तसेच नदीपात्र अरुंद करत आहे यामुळे पुराचा धोका निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमी नागरिकांनी देखील आक्षेप नोंदवला आहे. तसेच सध्या काम करत असलेल्या ठेकेदाराने कामावरील राडाराडा नदीच्या मूळ प्रवाहात टाकला आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत या ठेकेदारावर देखील तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई होणे आवश्यक आहे.

See also  मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब ४४ हजार ७८४ मते मिळवून विजयी – विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू