विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पोचे उद्घाटन

पुणे : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर ही संस्था उद्योग आणि कृषी क्षेत्रात उत्तम नेतृत्व करत असून उद्योजक, व्यापारी यांच्या विकासात संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

अॅग्रीकल्चर कॉलेज मैदान, शिवाजीनगर, येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे कुलगूरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुशील माशाळकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, विश्वस्त आशिष पेडणेकर आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर ही संस्था १९२७ पासून उद्योग आणि कृषी क्षेत्राचा समन्वय साधून शहरी तसेच ग्रामीण भागात उद्योगांचे चित्र बदलण्याचे काम करीत आहे. २०१५ पासून भारतात शाश्वत विकासाचे काम सूरू झाले असून शेतीतील अवजारे, दळणवळाणाची साधणे, लॉजिस्टीक सेवा यांच्यासह अनेक उद्योग भरभराटीला आले आहेत. गेल्या १५ ते २० वर्षात समाजात परिवर्तन मोठ्या प्रमाणात होत आहे. या बदलामुळे अन्न उद्योग आणि आदरातिथ्य क्षेत्रात उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाली आहे.

परदेशात स्थायिक झालेले भारतातील विद्यार्थी भारताच्या मातीशी नाते ठेऊन भारतातील उद्योग वाढण्याच्यादृष्टिने काम करीत आहेत. परदेशात उद्योग वाढ करण्यासाठी चेंबरने इंडोनेशिया देशातील जकार्ता येथे कार्यालय स्थापन केले आहे. अशाच प्रकारे इतर देशातही संस्थेने कार्य करावे. चेंबरने जगातील खंडानुसार इंटर्नल चॅप्टर तयार करावेत जेणेकरून तिकडचे उद्योजक, तिकडे गेलेले विद्यार्थी आणि आपले उद्दिष्ट यांचे सुसूत्रिकरण करता येईल. त्यानुसार शासनातर्फे तिकडच्या दुतावासाशी संपर्क करून उद्योगांना चालना देण्याचे काम करता येईल, असेही त्या म्हणाल्या.

चेंबरच्या माध्यमातून औद्योगिक नवकल्पना आणि पायाभूत सुविधासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण, आरोग्य, आर्थिक प्रगती या विषयावर अभ्यास करून त्या क्षेत्राला दिशा देणे आवश्यक आहे. ग्राहकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे जात असल्यामुळे किरकोळ व्यापारी अडचणीत येत आहेत. त्यासाठी ग्राहकांच्या गरजा बघून व्यापार करण्याची दिशा ठरवावी. सध्या सेवा क्षेत्र खुप दुर्लक्षित आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले तर चांगले मनुष्यबळ तयार होईल.

उद्योजक, व्यापाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उद्योजकांनी हॉटेल उद्योग सूरू करावेत. सौर ऊर्जेचे प्रकल्प स्थापन करण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी महसुल विभागनिहाय बैठकीचे आयोजन करून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, ग्वाही त्यांनी दिली.

श्री. गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरने उद्योगाचा पाया रचला आहे. राज्यातील नागरिकांनी उद्योगाकडे वळावे यासाठी चेंबर कार्य करीत आहे. ऑनलाईन खरेदीत वाढ पाहता किरकोळ व्यापाराला सावरण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन उपयुक्त ठरेल.

प्रास्ताविकात श्री. माणगावे यांनी चेंबरच्या कार्याची माहिती दिली. यावेळी श्री. पाटील आणि श्री. कोकाटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपसभापती श्रीमती गोऱ्हे यांनी प्रदर्शनातील काही स्टॉल्सना भेटी देवून पाहणी केली.

यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक निरंजन कान्हेकर, ज्यूट बोर्डाचे विपणन प्रमुख श्री. अय्यापन, महाप्रितचे व्यवस्थापक दीपक कोकाटे, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, मायटेक्सचे संयोजक दिलीप गुप्ता आदी उपस्थित होते.

प्रदर्शनात विविध नामांकित व्यापारी, उद्योजक, शिक्षण संस्था, कृषी प्रक्रिया उद्योग, उद्योजक, बांधकाम उद्योजक, आयटी, शिक्षण ऑटोमोबाईल, गृहप्रकल्प, सोलर क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील उद्योजकांचा यामध्ये सहभाग आहे. व्यापार, उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगांच्या नवीन संधीसह विविध विषयावर सेमिनार होणार असून व्यापार, उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगांना व्यवसाय वृद्धीची संधी `मायटेक्स एस्क्पो` द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

See also  मुक्तछंदच्या महिला उद्योजकांच्या वस्तूंच्या “धागा” प्रदर्शनाचे उदघाटन