पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती आली आहे, असा विश्वास महाविकास आघाडी, इंडिया आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात धंगेकर यांनी म्हटले आहे की, पूर्णपणे सक्रिय झालेली महाविकास आघाडीची यंत्रणा, मित्रपक्षांकडून मनापासून मिळणारे सहकार्य आणि नागरिकांच्या सर्वच स्तरांतील घटकांतून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लोकसभेची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती आली आहे.
महाविकास आघाडीने या निवडणुकीत पहिल्यापासूनच उत्तम यंत्रणा कामाला लावली. राष्ट्रीय व राज्यपातळीवरील अनेक नेते पुण्यात प्रचाराला येत आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदा आणि मित्रपक्ष, तसेच विविध संघटनांचे नेते नियमितपणे पत्रकार परिषदा घेऊन महाविकास आघाडीची बाजू प्रसारमाध्यमांमध्ये जोरकसपणे मांडत आहेत. त्याचेही विधायक पडसाद आम्हाला जाणवत आहेत. महापालिका, तसेच विधानसभास्तरावर मी स्वतः केलेले काम आणि नागरिकांच्या प्रश्नावर उठवलेला आवाज याची पावती ठिकठिकाणी लोकांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीच्या पारंपरिक मतांमध्ये यंदा मोठी वाढ होत असल्याचे दिसत असून, भाजपच्या राजवटीला कंटाळलेला मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय मतदारही मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे वळत असल्याचे पुण्यातील चित्र आहे. गरीब आणि कष्टकरी जनतेच्या हालाकीत जी भीषण वाढ झाली आहे, त्यामुळे या वर्गात यंदा ‘अच्छे दिन’च्या थापा मारणारे मोदी सरकार अजिबात नको, अशी भावना निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात लोकांची फसवणूकच केली. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची महागाई यामुळे मध्यमवर्गीय त्रस्त झाला आहे. तसेच वाढलेला औषधोपचारांचा खर्च, शिक्षण खर्च आणि जीएसटीसारखे लादण्यात आलेले कर यामुळे सामान्य नागरिक पिचून गेला आहे. मोदी सरकारच्या राजवटीत मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार, इलेक्टोरल बॉण्ड घोटाळा, पीएम केअर फंड घोटाळा, नोटाबंदीच्या काळात झालेले गैरव्यवहार या सगळ्या गैरप्रकारांची पुणेकरांना चांगलीच माहिती असल्याचे प्रचारकाळात दिसून येत आहे. त्यावर नागरिक तीव्र संतापही व्यक्त करीत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने या राजवटीला वैतागलेला पुणेकर स्वयंस्फूर्तीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आम्हाला अत्यंत सोपी झाली आहे, असेही धंगेकर यांनी म्हटले आहे.