पुणे पुस्तक महोत्सव वाचन संस्कृती बळकट करणारा महोत्सव यंदा नवा विक्रम प्रस्थापित करेल; मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

पुणे : ‘विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे बुद्धिवंतांचे शहर असून, राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यनगरीच्या या वैभवात पुणे पुस्तक महोत्सव भर घालत असून, वाचन संस्कृती बळकट करत आहे. या महोत्सवाची ख्याती आता दिल्लीतही पोहोचली आहे. पुणेकरांच्या उत्साहामुळे या महोत्सवाची व्यापकता व भव्यता वाढत असून, यंदाही हा महोत्सव नवा विक्रम प्रस्थापित करेल,’ असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी व्यक्त केला.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सव १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्या निमित्ताने संविधान दिनाचे औचित्य साधत यंदाच्या तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सव कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.  फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ संपादक व लेखक अरुण खोरे, ज्येष्ठ साहित्यिका व माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, पुणे पुस्तक महोत्सवाचे प्रमुख संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, महोत्सव संयोजक प्रसेनजित फडणवीस आणि आनंद काटीकर, तसेच बागेश्री मंठाळकर व डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मोबाइल आणि समाजमाध्यमांच्या काळात पुणे पुस्तक महोत्सवातून पुस्तक वाचनाबाबतची जागृती होत आहे. ‘पुणेकर वाचत आहेत,’ या उपक्रमातून वाचन चळवळीला नवे बळ मिळत आहे. या महोत्सवाचा प्रतिसाद वर्षागणिक वाढत आहे. त्यामुळे हा महोत्सव राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध पावला असून, संसदेच्या अधिवेशनातही त्याची चर्चा होत आहे,’ असेही मोहोळ यांनी अभिमानाने सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पुस्तकांची जादू वेगळीच असून, ती सर्वसामान्यांच्या जीवनाला प्रेरणा व दिशा देतात. पुस्तकांची ही ताकद पुणे पुस्तक महोत्सव अधोरेखित करते. युनेस्कोच्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ दर्जासाठी पुणे शहराला नामांकन मिळाले असून, त्यासाठी यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव अतिशय महत्त्वाचा आहे.’

संविधान दिनी पुणे पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयाचे उदघाटन होत असल्याचा आनंद व्यक्त करत डॉ. अरुण खोरे यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि थोर साहित्यिक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या पुस्तक प्रेमाच्या आठवणी सांगितल्या. ‘या पुणे महोत्सवाने सर्वसामान्यांना पुस्तकांच्या ज्ञानसागरात विहार करण्याचा आनंद दिला असून, तो अधिक वृद्धिंगत व्हावा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘पुणे पुस्तक महोत्सवातून ‘वाचणारा माणूस’ घडावा,’ असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या.

See also  राज्यघटना सगळ्यांना माणूस म्हणून समृध्द करते : प्राचार्य डाॅ संजय खरात

पुणे पुस्तक महोत्सवाचे प्रमुख संयोजक राजेश पांडे यांनी महोत्सवाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. ‘डॉ. आंबेडकर यांना पुस्तक वाचनाची प्रचंड आवड होती. संविधान हे आपल्या सर्वांचे आदर्श आहे. त्यामुळे संविधान दिनानिमित्त राज्यघटनेचे पूजन करून पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयाचे उदघाटन करत आहोत. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गत वर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवात ९७ हजार पुस्तकांच्या साह्याने संविधानाचे मुखपृष्ठ साकारण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, एक हजार पुस्तकांचे स्टॉल आरक्षित झाले आहेत. पुणेकरांनी या वाचन चळवळीला अधिक बळकट करावे,’ असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी, संविधानाच्या प्रतिमेचे पूजन आणि उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. संयोजक आनंद काटीकर यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील भणगे यांनी आभार मानले.