कोथरूड मधील भाजपाचा तिकिटासाठीचा सामना रंगतोय

पुणे : भाजपामधून कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले उमेदवार अमोल बालवडकर यांच्या घरी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल दोन तास चर्चा करून अमोल बालवडकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ही चर्चा यशस्वी झाली नाही. यामुळे कोथरूड मधील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत.

कोथरूड मतदार संघातील भाजपाचे पदाधिकारी अमोल बालवडकर यांच्या कार्यक्रमांना जात नसल्याने नाराज झालेल्या अमोल बालवडकर यांनी काहीसे आक्रमक होत चंद्रकांत दादांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. पुणे शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे कार्यक्रम आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी नको म्हणून सातत्याने टाळले होते. तर अमोल बालवडकर भाजपा सोडण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा देखील सातत्याने राजकीय रिंगणात घडवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब राजकीय वर्तुळात व पुणे शहराच्या राजकारणात महत्त्वपूर्ण असून कोथरूड विधानसभेचा भाजपचा उमेदवार विजयी होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.

मात्र प्रदेशाध्यक्ष घरी येऊन देखील ही चर्चा निष्फळ ठरली त्यामुळे कोथरूड भाजप हा भूकंपाच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जातं आहे. जोपर्यंत पक्ष उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत मी आशावादी आहे. मला अपेक्षा आहे मला उमेदवारी मिळेल अशी प्रतिक्रिया बालवडकर यांनी दिली आहे.

पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी पुण्यातील सर्वच बडे नेते, इच्छुक आणि विद्यमान आमदार देखील आले होते. मात्र या सगळ्यात कोथरूडमधून आक्रमक प्रचार करणारे आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आपली प्रबळ दावेद्वारे सांगणारे अमोल बालवडकर हे उपस्थित नव्हते.  त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात असताना अमोल बालवडकर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करतील अशी शक्यता होती. मात्र अमोल बालवडकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सर्वच बैठकांकडे पाठ फिरवली. कोथरूडमधील वातावरण तापलेलं दिसत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अमोल बालवडकर यांच्या घरी जाणं पसंत करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

See also  पुणे जिल्ह्याला मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता

सध्या चंद्रकांत दादा पाटील यांची उमेदवारी भाजपामधून निश्चित मानली जात असली तरी मागील वेळी विद्यमान आमदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांचे तिकीट पक्षासाठी कापण्यात आले होते. हा इतिहास पाहता भाजपामध्ये कोथरूड मतदारसंघात माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचे तिकीट कापले जाणार की कोथरूडमध्ये भाजपा विरुद्ध बंडखोर भाजपा असा सामना पाहायला मिळणार  याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.