बाणेर-बालेवाडी येथील सबस्टेशनच्या जागेचा प्रश्न सोडविण्यात बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनला यश: मानले चंद्रकांत पाटील यांचे आभार

बाणेर : बाणेर-बालेवाडी जवळच हिंजवडी आयटी हब असल्याने आणि बाणेर बालेवाडी येथे अनेक आयटी कंपन्या कार्यरत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प येत आहेत. आणि लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येथील विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत असून त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन विजेमध्ये प्रचंड चढ-उतार होत आहेत. बालेवाडीतील नागरिकांना दररोज मोठी गैरसोय सहन करावी लागत असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या वतीने अनेक महिन्यांपासून येथील महावितरण कार्यालयाकडे याप्रश्नी पाठपुरावा केला गेला. यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) ने स्वतंत्र २२० केव्ही विद्युत उपकेंद्र मंजूर केले होते व जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. परंतु योग्य जागेअभावी हा प्रकल्प बराच काळ प्रलंबित राहिला होता. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने याबाबत पुढाकार घेऊन महापारेषण, महावितरण,जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय ह्यांच्याशी सतत  पाठपुरावा केला. याबाबतीत आमदार चंद्रकांत  पाटील यांची जागा मंजूरीसाठी मोलाची मदत झाली आहे.

सर्वांच्या प्रयत्नांना शेवटी  यश येऊन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बालेवाडी येथील सर्वे नं. ४/१ ची ०. ६५ हे. जागा महापारेषणला हस्तांतरित करण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून निघाला.सबस्टेशनच्या जागेचा प्रश्न सोडविल्या बद्दल फेडरेशनच्या सभासदांनी आज चंद्रकांत दादांची भेट घेऊन त्यांचे हार्दिक आभार मानले. अशोक नवाल, रमेश रोकडे,  मोरेश्वर बालवडकर, आशिष कोटमकर आणि ॲड. माशाळकर या फेडरेशनच्या सदस्यांनी सदर मंजुरीसाठी विशेष परिश्रम घेतले. स्वतंत्र सबस्टेशन झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होऊन बाणेर बालेवाडी करांचा प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास याप्रसंगी फेडरेशनतर्फे मोरेश्वर बालवडकर यांनी व्यक्त केला.

See also  हरिलीला सोसायटी येथील ड्रेनेज लाईनची सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी मंगळवार पासून काम सुरू करणार