त्यांचा नारा ‘बटेंगे तो कटेंगे’ आहे, तर आपला नारा ‘नफरत की बाजार मी मोहब्बत की दुकान’ असा आहे – खासदार इम्रान प्रतापगढी ; प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ कोंढव्यात सभा

हडपसर :  “ही निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी नाही, तर जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात आहे. द्वेष विरुद्ध प्रेम अशी ही लढाई आहे. त्यांचा नारा ‘बटेंगे तो कटेंगे’ आहे, तर आपला नारा ‘नफरत की बाजार मी मोहब्बत की दुकान’ असा आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून जाती-धर्मात फूट पाडणाऱ्या, महाराष्ट्राला लुटणाऱ्या भाजप व महायुतीला घरी बसवा,” असा हल्लाबोल काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केला.

हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे  अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप  यांच्या प्रचारार्थ कोंढव्यात आयोजित जाहीर सभेत खासदार इम्रान प्रतापगढी बोलत होते. खासदार मोहम्मद फैजल, उमेदवार प्रशांत जगताप, अजमेर शरीफ दर्गा कमिटीचे चेअरमन अमीन पठाण यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कोंढवा भागातील पदाधिकारी उपस्थित होते.

इम्रान प्रतापगढी म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून भाजपाने देशात जातीवाद पसरवून हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातच्या रिमोट कंट्रोलवर महाराष्ट्र चालवण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रात भाजपने फोडाफोडी केली, चिन्हे पळवली, पक्ष पळवला. मात्र, तुम्ही घडी चोरली, तरी वेळ कशी चोरणार? केंद्रातही दोन कुबड्यांवर आधारित सरकार आहे. भारताचे संविधान, महाराष्ट्राची अस्मिता  वाचवण्याची ही लढाई आहे. गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या नितेश राणे यांच्यासारख्या वाचाळवीरांना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या प्रशांत जगताप यांना निवडून द्यावे.”

प्रशांत जगताप यांनी हडपसरच्या विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली. ‘हडपसर हे पुण्याचे सांस्कृतिक माहेरघर आहे, परंतु भाजप आणि त्यांचे लोक या सांस्कृतिक वारशाला तडा देण्याचे काम करत आहेत. ‘लाडकी बहीण-लाडका भाऊ’ यांसारख्या योजनांतून भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. त्यापासून जनतेने सावध राहून महाविकास आघाडीला निवडून द्या.कोंढव्यातील या सभेने निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तापली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आक्रमक प्रचारामुळे हडपसर मतदारसंघात प्रचंड ऊर्जा दिसून येत आहे. प्रशांत जगताप यांनी आपल्या प्रभागाच्या विकासाची हमी देत जनतेचा विश्वास संपादन केला आहे, तर इम्रान प्रतापगढी यांच्या जोरदार टीकेमुळे भाजपवरील दबाव वाढत आहे.

See also  भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवात दिग्गज गायकांची रसिकांवर मोहिनी