हिंजवडी मेट्रो मार्गावरील बालेवाडी हाय स्ट्रीट व बालेवाडी फाटा नवी दोन मेट्रो स्थानके कार्यान्वित केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सुरुवात

बालेवाडी : पुणे मेट्रो लाईन-३ वरील बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन मेट्रो स्थानके केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कार्यान्वित करून प्रवाशांसाठी खुली केली. यानिमित्त बालेवाडी हाय स्ट्रीट ते औंध मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रोतून प्रवास केला आणि पुणेकर प्रवाशांशी मुरलीधर मोहोळ यांनी संवाद साधला.

यावेळी पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पुणे मेट्रो ३ चे मुख्याधिकारी अनिल सैनी, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगसेविका रोहिनी चिमटे, नगरसेविका मयुरी कोकाटे, नगरसेवक सनी निम्हण, राहुल बालवडकर, सामाजिक कार्यकर्ते अमर लोंढे, जीवन चाकणकर, मोरेश्वर बालवडकर, अनिकेत चांदेरे यांच्यासह मेट्रोच्या विविध विभागांचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम साथीने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरण आणि विस्ताराला गती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ३ नोव्हेंबर रोजी पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण झाले. या मार्गिकेवरील एकूण २३ स्थानकांपैकी १६ स्थानके पहिल्या टप्प्यात कार्यान्वित झाली. आज आणखी दोन स्थानके कार्यान्वित झाल्याने ही संख्या १८ झाली असून, येत्या दोन महिन्यांत आणखी चार मेट्रो स्थानके कार्यान्वित होणार आहेत. म्हणजेच हा संपूर्ण मेट्रो मार्ग येत्या दोन महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. तसेच दैनंदिन सरासरी ५० हजारांवर असलेली प्रवासी संख्याही वेगाने वाढणार आहे.
मेट्रोच्या विस्तारणाऱ्या जाळ्यामुळे पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि पर्यावरणपूरक होण्यासोबतच शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या, शहराचा विस्तार आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक, सक्षम आणि एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

बालेवाडी हाय स्ट्रीट व बालेवाडी फाटा ही महत्त्वपूर्ण दोन मेट्रो स्टेशन सुरू झाल्याने बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांनी मेट्रो उद्घाटनाच्या वेळी बाणेर बालेवाडी परिसरातील मेट्रो स्टेशन लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर दोन मेट्रो स्टेशन सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

See also  निवासी मिळकत धारकांना 40 टक्के कर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढ मिळावी सुनील माने यांची मागणी