पुणे : केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय सनद वाटप कार्यक्रम जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आला; यावेळी १९१ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सनद वाटप करण्यात आल्या.
यावेळी आमदार सुनील कांबळे, हेमंत रासने, अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अति. संचालक भूमि अभिलेख आनंद भंडारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, भूमि अभिलेखचे उपसंचालक राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.
जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर आयोजित केलेल्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये प्रॉपर्टी कार्डचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. पुणे जिल्हातील १३ तालुक्यामधील १ हजार १४९ गावांना स्वामीत्व योजना लागू करण्यात आली असून ड्रोन प्लॉयींगचे काम पुर्ण झाले आहेत. ७८२ गावांच्या सनद व मिळकतपत्रीका तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७२ गावात सनद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
श्री. मोहोळ म्हणाले, केंद्रसरकारच्या विविध लोकल्याणकारी योजना तसेच स्वामित्व योजनेपासून नागरिकांना होणाऱ्या लाभाविषयी माहिती दिली.
श्री. भंडारी यांनी प्रस्ताविकात स्वामित्व योजनेची माहिती देऊन सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी उपस्थिताचे आभार मानले.
महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत राज मंत्रालय, भारत सरकारयांच्यावतीने स्वामित्व योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकतधारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करुन देताना संबंधित मिळकतधारकाला ‘दस्तऐवजाचा हक्क’ प्रदान करणेत येत आहेत. या योजनेमध्ये ड्रोन द्वारे हवाई मॅपींग करून गावठाणातील मिळकतींचे नकाशे तयार करण्यात येतात. या नकाशांचे ग्राऊंड ट्रथींग करून हक्क चौकशीअंती मिळकतींच्या सनदा व मिळकतपत्रिका तयार करण्यात येतात.
कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान श्री. मोदी यांनी दुरदृष्यप्रणाली नागरिकांशी संवाद साधला. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत मालमत्ता विषयक कागदपत्र उपलब्ध झाल्याने ग्रामीण क्षेत्रातील लोकांना सक्षम बनविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते आज ६५ लाख मालमता पत्रकांचे आभासीपद्धतीने लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.