साखरे ईस्टर्न मिडोज खराडी सोसायटीमध्ये शिवजयंतीचा जल्लोष, भव्य मिरवणुकीने साजरी उत्सवमूर्ती सोहळा

पुणे :  साखरे ईस्टर्न मिडोज खराडी सोसायटीमध्ये शिवजयंती उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोसायटीच्या आवारात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सोसायटीमधील बालकांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा निनाद होत होता. संबळ, तुणतुणे, झांज वादन यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले. या उत्सवामध्ये पालखीसह पारंपारिक पद्धतीने वेशभूषा परिधान केलेले बालक आणि तरुण सहभागी झाले होते. तसेच पालक आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध शिवव्याख्याते माननीय योगेश पाटील यांचे प्रेरणादायी भाषण. त्यांनी शिवचरित्रातील महत्त्वाच्या घटनांचे विवेचन करून उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. सोसायटीतील बालगायक अर्णव, कियान आणि निमेश यांनी शिवरायांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा जोशपूर्ण पोवाडा सादर केला, ज्याने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या सांगतेसाठी राजेंद्र लडकत यांच्या दमदार शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दणाणून गेला. सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला. महिलांनी पारंपरिक पेहराव करून उत्सवात रंग भरले, तर जेष्ठ नागरिकांनीही शिवचरित्राच्या आठवणींना उजाळा दिला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सोसायटीतील सर्व सदस्य, महिला मंडळ, युवक आणि बालगोपाळांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित सर्वांनी संयोजकांचे आणि सहभागी कलाकारांचे कौतुक केले.
शिवजयंतीनिमित्त झालेल्या या उत्सवाने संपूर्ण सोसायटीमध्ये शिवमय वातावरण निर्माण झाले.

See also  'उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत बुधवारपासून ‘फळ व धान्य महोत्सव’