औंध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ३६ पैकी फक्त ९ आठवडे बाजार अधिकृत; रस्ते अडवणाऱ्या अनाधिकृत आठवडे बाजारांवर कारवाईची मागणी

बाणेर : औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत विविध राजकीय कार्यकर्त्यांचे सुमारे ३६ आठवडे बाजार भरवले जात असून यापैकी केवळ ९ आठवडे बाजारांना प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. बाकीचे सर्व आठवडे बाजार राजकीय वरदहस्ताने कार्यकर्त्यांच्या बॅनरबाजी ची सोय म्हणून चालवले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

“विकेल ते पिकेल” या शासनाच्या धोरणातील संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत आठवडे बाजाराला पुणे महानगरपालिकेच्या अमेनिटी स्पेस, तसेच बंद रस्त्यांच्या जागेमध्ये आठवडे बाजार एक दिवस भरवण्याची परवानगी शेतकरी कंपन्यांना दिली आहे. परंतु या आठवडे बाजारांना पुणे महानगरपालिकेला अनामत रक्कम व भुई भाडे देणे आवश्यक आहे याची रक्कम देखील पुणे महानगरपालिकेने एका स्टॉल साठी 50 रुपये निश्चित केली आहे. तसेच अनामत रक्कम प्रति स्टॉल 100 रुपये असून हे स्टॉल दिलेल्या जागेत भरवणे बंधनकारक आहे.

परंतु औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सध्या सुरू असलेल्या 36 बाजारांपैकी अवघ्या ९ शेतकरी कंपन्यांनी अटींची पूर्तता केली आहे. अनेक आठवडे बाजार हे रस्त्यांच्या मधोमध भरवले जात आहेत. वाहतुकीला यामुळे अडथळा निर्माण होतो. तर काही आठवडे बाजारांवर अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो बॅनर सह झळताना दिसतात. या आठवडे बाजारातील स्टॉल धारकांना प्रति स्टॉल ५०० रुपयांहून अधिक रक्कम राजकीय कार्यकर्त्यांना द्यावी लागत असल्याचे स्टॉल धारक नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात.

या आठवडे बाजारामध्ये नागरिकांना शेतकऱ्यांकडून आलेला माल स्वस्त दरात मिळत नाही. याउलट मध्यस्थ व्यापारी शेतकरी गटाकडून बाजार दरानुसार लावली जाणारी किंमत ग्राहकांना द्यावी लागते. पुणे महानगरपालिकेचे भुईभाडे देखील परवानगी देण्यात आलेल्या आठवडे बाजारांनी भरलेले नाही. तर काही आठवडे बाजार हे परवानगी एका ठिकाणी व आठवडे बाजार दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने लावले जात असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. अनधिकृत आठवडे बाजारांवर तातडीने कारवाई करावी तसेच पुणे महानगरपालिकेच्या बांधलेल्या भाजी मंडईमध्ये आठवडे बाजार भरवले जावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  ते पोलिस स्टेशन आहे, तुमच्या घरचा डायनिंग टेबल नाही ! खासदार सुप्रिया सुळेंचा लोहगांवमध्ये स्थानिक आमदारांवर जोरदार प्रहार,