मराठी भाषा जगवली, जोपासली पाहिजे, भाषेचा सन्मान केला पाहिजे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 27 : मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक जगभरात पसरलेले आहेत. परंतु काही मराठी माणसे एकमेकांना भेटल्यावर उगाच हिंदी, इंग्रजीत बोलतात. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे मराठीतच बोललं पाहिजे. जे जे मराठी आहे ते ते सर्व आपण जगवले पाहिजे, वाढवले पाहिजे, जोपासले पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे गौरव व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार डॉ.मनीषा कायंदे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच साहित्य क्षेत्रातील दिग्गज, नामवंत साहित्यिक, लेखक, प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रावसाहेब रंगराव बोराडे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कन्या श्रीमती प्रेरणा दळवी यांना प्रदान करण्यात आला. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला प्रदान करण्यात आला. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना प्रदान करण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणले की, आपल्या प्रत्येक वर्तनातून मराठीचा अभिमान जागवला पाहिजे. हिच खऱ्या अर्थाने माय मराठीची सेवा ठरेल. माय मराठीवर नुसते प्रेम करून भागणार नाही. तर मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला, संगीत, खाद्य पदार्थ हे सगळं आपण टिकवले पाहिजे. मराठीत बोलणारा, मराठी ऐकणारा आणि मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजे, वाढवला पाहिजे. मराठीचा आग्रह धरण म्हणजे इतर भाषाचा द्वेष करणे असे नाही. भाषा ही आपली अस्मिता आहे, भाषा ही आपली ओळख आहे, भाषा आपला अभिमान आहे, भाषा हेच आपले अस्तित्व आहे. काळाच्या ओघात किती तरी भाषा नामशेष झाल्या आहेत. आपली भाषा संपली तर एक दिवस आपलं अस्तित्व संपेल. त्यामुळे भाषेचे जतन आणि संवर्धनाची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. केवळ जबाबदारीच नाही तर ते प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य असल्याचे श्री.शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आता तर संगणक तंत्रज्ञान आलं, ज्ञान शाखांमधलं ज्ञानही मराठीत मिळतेय. आपली भाषा ही ज्ञान भाषा व्हायला हवी. ती व्यवहाराची भाषा झाली तर अजून समृद्ध होईल. मराठी भाषेचा व्यवहारात वापर केला पाहिजे. प्रसार, विस्तार, संवर्धन या चारही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून त्यासाठी भाषातज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भरीव निधी : उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटीबद्ध असून, निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मराठी कवी सुरेश भट यांच्या ओळींना स्मरून, मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण जगभरातील मराठी जनांची ओळख आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, ज्येष्ठ साहित्यिक आणि प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अतिशय मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या समितीतील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले असून, त्यांच्या योगदानाला संपूर्ण महाराष्ट्र कृतज्ञ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी संस्कृती, भाषा आणि परंपरेचा अभिमान बाळगण्याचा संदेश देण्यात आला.

साहित्य क्षेत्रात लवकरच युवक, महिला आणि बाल साहित्य संमेलनाचे आयोजन – मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांची घोषणा

मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले की, राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा विभाग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून, परदेशातील मराठी बृहन्मंडळांची संख्या ५० पर्यंत वाढवण्याचा संकल्प आहे.

डॉ.सामंत म्हणाले की, सीमा भागातील मराठी संस्कृती आणि साहित्य संवर्धनासाठी सरकार विशेष निधी उपलब्ध करून देणार असून, साहित्याला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. तसेच दिवंगत साहित्यिक रा.रं.बोराडे यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली असल्याचे मराठी भाषा मंत्री यांनी स्पष्ट केले.

विंदा करंदीकर पुरस्कार यापुढे गेटवे ऑफ इंडियावर प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कुसुमाग्रज यांच्या जन्मगावाला ‘कवितांचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले असून, तेथे साहित्यिक उपक्रमांना चालना दिली जाईल, असेही मंत्री डॉ.सामंत यांनी यावेळी सांगितले.

या सोहळ्यात ‘पुस्तकांचे हॉटेल’ या अनोख्या उपक्रमाचा विशेष उल्लेख करण्यात आला, जिथे ग्राहकांनी जेवणासोबत वाचनाचा आनंद घ्यावा, अशी संकल्पना राबवली जाते, असेही डॉ.सामंत यांनी सांगितले. साहित्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी सरकार कटिबद्ध असून, युवक, महिला आणि बाल साहित्य संमेलनांच्या आयोजनाची घोषणा करण्यात आली.

या मराठी भाषा गौरव दिनी ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात वाङमय पुरस्कार प्रकार – प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला आहे. प्रौढ वाडमय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, प्रौढ वाङमय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, प्रौढ वाडमय लघुकथा याकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निंबाळकर यांना, प्रौढ वाङमय ललितगद्य याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, प्रौढ वाङमय-विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. प्रौढ वाङमय चरित्र याकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, प्रौढ वाङमय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा.राठोड यांना, प्रौढ वाङमय समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के.क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.

त्याचप्रमाणे, प्रौढ वाङमय इतिहास याकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञान याकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच तत्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्र करिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना प्रदान करण्यात आला.

वाङमय पुरस्कार प्रकार – बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तर, नाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना, सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना प्रदान करणार आला.

वाङमय पुरस्कार प्रकार – प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.

वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला.

See also  बदलापूर - अकोला - कोल्हापूर लैंगिक अत्याचार प्रकरणांचा आणि  राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीचा कोथरूड येथे इंडिया आघाडी तर्फे निषेध