सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख व्हावे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.१७:  जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

बिबवेवाडी येथे रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, रामराज्य सहकारी बँकेचे संस्थापक ॲड. सुभाष मोहिते, विजय मोहिते, अध्यक्षा नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते, संचालक मंडळ परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्यात सहकारी चळवळ वाढविण्यामध्ये धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख, शरद पवार यांचे मोठ्या प्रमाणात  योगदान आहे. सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून  झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘प्रकरणे’ दाखल करावी लागणार आहेत. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर सकारात्मक विचार करुन निर्णय घेण्यात येईल. सहकारी बँकेने आपल्या व्यवहारात मानवी चेहरा देण्याचे काम केले आहे,   सहकारी क्षेत्रातील बँकेने अपेक्षित उद्दिष्टांपेक्षा अधिक नफा मिळविण्यास प्रोत्साहन देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.

रामराज्य सहकारी बँक मागील २५ वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांना पुढे आणून त्यांची पत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये संचालक मंडळ, सभासद कर्जदारांचे फार मोठे योगदान आहे. सभासदांचे हित जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. बँकेने ठेवी वाढविण्यासोबत खात्रीलायक कर्जदार मिळविण्याकरिता प्रयत्न करावे. नागरिकांना पारदर्शक पद्धतीने सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न करावा. बँकिंग व्यवसायात विश्वासर्हता जपणे गरजेचे आहे. तरुणांना संधी देऊन त्यांना बँकीग क्षेत्राचे प्रशिक्षण देण्याचे काम करावे. थकीत कर्जाकडे बारकाईने लक्ष द्यावे. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ होत असून सहकारी बँकांनी राज्य सहकारी बँकेसोबत संलग्न झाले पाहिजे, असेही श्री. पवार म्हणाले.

संस्थापक श्री. विजय मोहिते यांनी प्रास्ताविकात रामराज्य सहकारी बँकेच्या शहरासह ग्रामीण भागात एकूण ८ शाखा असून नागरिकांना बँकिंग सुविधा पारदर्शक पद्धतीने देण्यात येत आहे, असे म्हणाले.श्रीमती लोणकर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर ॲड. मोहिते यांनी बँकेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली.

See also  बिबवेवाडी आरक्षण प्रकरणात राज्य सरकारचे नाव खराब होत आहे- आमदार माधुरी मिसाळ यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र