शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते.

उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलनियोजन पासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासून बाजारसाखळी तयार करण्यापर्यंत पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन अशा सर्व बाबी गावात पूर्ण करून गावातला छोट्यातला छोट्या शेतकऱ्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ होईल असा प्रयत्न करण्यात आला आहे. नुकतेच पिक विमा योजना सुधारित केली आहे.

श्री.फडणवीस पुढे म्हणाले, शेतीच्या क्षेत्रात यावर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार अशी २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, पंप आदी देण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गतकाळात निर्णय घेतल्याप्रमाणे साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल आकारले जात नाही.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, योजनांची आणि ते मोठ्यातला शेतकरी अशा सर्वांना त्यांचा लाभ घेण्याची माहिती मिळावी यासाठी कृषी प्रदर्शन भरवावे अशी अपेक्षा सुधाकरपंत परिचारक यांनी २०१५ साली व्यक्त केली होती. तेव्हापासून दरवर्षी हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यामध्ये शासनाचे विविध विभाग, कृषी विद्यापीठे यांचे स्टॉल, विविध योजना, वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगांचाही या प्रदर्शनात समवेत आहे. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर, उत्पादकता वाढविण्यासाठीच्या वेगवेगळी पद्धतींचेही प्रदर्शन या ठिकाणी पहायला मिळत आहे. सेंद्रिय खते, नैसर्गिक खते, वेगवेगळ्या खतांचे मिश्रणे, माती परीक्षण ते कापणीपर्यंत पर्यंतच्या वेगळगवेगळ्या तंत्रज्ञानाची झलक येथे पाहायला मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पणनच्या योजनांचा लाभ बाजार समित्यांच्या माध्यमातून मिळत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय संस्थात रूपांतरण करण्याचा केंद्र शासनाच्या प्रयत्न असून १८ प्रकारचे व्यवसाय या संस्थाना करता येणार आहेत. बाजार आणि शेतकऱ्यांमध्ये दुवा ठरण्याचे काम या संस्था करतील. स्टोरेज, कोल्ड स्टोरेज आदी व्यवस्था करून शेतकऱ्यांच्या माल योग्य भावात मोठ्या प्रमाणात माल विकला जाईल असा प्रयत्न असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अत्यंत प्रगतिशील असून अत्यंत चांगले काम करते. समितीने पणन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

ॲड. कोकाटे म्हणाले, वारकरी आणि शेतकरी हे वारीच्या दोन बाजू आहेत. शेतीत येणाऱ्या तंत्रज्ञानाची वारीत सहभागी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी चांगले प्रदर्शन भरविण्यात आले आहे.  शेती चांगली आणि सुरळीत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. या प्रदर्शनात सुमारे २५० स्टॉलच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, पीएमएफएमई योजना, आत्मा, स्मार्ट प्रकल्प आदींची माहिती व प्रदर्शन केले आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत चांगली शेती करतात. केळीची निर्यात मोठी प्रमाणात होते.
माशीमुळे डाळिंब आणि इतर फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी बॅगेज, ठिबक, मलचिंग पेपर आदीं योजनांचा फलोत्पादसाठी  शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्य आणि केंद्र सरकार मिळून शेतकरी स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपल्याला
एआय मध्ये मोठे काम करायचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने कृषी मध्ये ५००, कोटींची तरतूद केली आहे, असेही ॲड. कोकाटे म्हणाले.

श्री. रावल म्हणाले, पंढरपूर बाजार समिती ही उत्कृष्ट बाजार समिती आहे. केळीचे सर्वात मोठे निर्यात हब सोलापूर जिल्हा आहे. मनुके, द्राक्ष, डाळिंबाच्या क्षेत्रात प्रगती करणारा हा जिल्हा आहे. ड्रॅगन फ्रुटचे लागवड करण्याचे धाडस या तालुक्यात झाले आणि ते यशस्वीही करण्यात आले.
लवकरच एडीबीची योजना राज्यात आणण्याचा प्रयत्न होणार आहे. यामध्ये मार्केट कमिटीची बळकटी करण्यासाठी योजना आणण्यासाठी प्रयत्न होणार. त्यात पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ही बाजार समिती एक अग्रेसर बाजार समिती आहे. ५५० कोटीच्यावर उलाढाल या बाजार समितीच्या माध्यमातून केली जाते. बेदाण्याचे मोठे मार्केट या बाजार समितीत आहे. चांगल्या प्रकारची शेती या भागातील शेतकरी करतात. मुख्यमंत्री यांनी पंढरपूर हे भविष्यकाळातील एक मोठे तीर्थक्षेत्र होण्यासाठी ध्यास घेतला आहे. प्रशासनाने आषाढी वारीचे अत्यंत चांगले नियोजन केले, असेही ते म्हणाले.

यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

See also  पुणे महापालिकेतील केबल डक्टच्या २६ हजार कोटीच्या घोटाळ्याची एस.आय.टी. मार्फत चौकशी करावी - सुनील माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार प्रदेश सरचिटणीस