पुणे | प्रतिनिधी : “नको आम्हास सोनेवाडी, बरी आहे आमची केळेवाडी” असा एकच नारा देत केळेवाडी येथील जयराम सहकारी गृह रचना संस्थेच्या नवनिर्वाचित सुमारे २००० सभासदांनी एसआरए (Slum Rehabilitation Authority) प्रकल्पाला पूर्ण ताकतीनिशी विरोध करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
बाल शिवाजी मित्र मंडळ येथे नुकत्याच पार पडलेल्या सोसायटीच्या विशेष सभेमध्ये हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभेमध्ये उपस्थित सभासदांनी बिल्डरकडून सुरू असलेल्या कथित अन्यायकारक आणि मनमानी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. १७ इमारतींमध्ये तब्बल ६५०० फ्लॅट उभारण्याचा घाट बिल्डरने घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकल्पाला मदत करणारे राजकारणी व दलाल यांना ‘कात्रजचा घाट’ दाखवण्याचा इशारा देखील सभासदांनी दिला.
सभेमध्ये सरकारच्या धोरणांचा उल्लेख करताना, राज्य शासनाचा ५५० स्क्वेअर फूट घराचा GR असतानाही बिल्डर केवळ ३७० स्क्वेअर फूट सदनिका देण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यामुळे गोरगरीब नागरिकांवर अन्याय होत असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.
याशिवाय प्रस्तावित १४ मजली इमारतींमध्ये कोणतेही सार्वजनिक मंडळ, समाज मंदिर किंवा मंदिराचा उल्लेख नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. केळेवाडी परिसरात अस्तित्वात असलेली तीन समाज मंदिरं असूनही त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच मामासाहेब मोहोळ व्यायाम विकास मंडळाची तब्बल एक एकर तालीमची जागा बिल्डरने गिळंकृत केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सभासदांनी केली आहे. एसआरए प्रकल्पाच्या नावाखाली होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत हा लढा कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
























