पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून भारतीय जनता पार्टीच्या रोहिणी सुधीर चिमटे यांनी ४१ हजार ९८० मतांची विक्रमी आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह त्या पुणे शहरातील सर्वाधिक मते घेणाऱ्या नगरसेविका ठरल्या आहेत.रोहिणी चिमटे या यापूर्वीही सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अनुभव, विकासाभिमुख कामकाज आणि सातत्यपूर्ण जनसंपर्कावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे या परिसरातील नागरिकांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले. या भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता आणि नागरी प्रश्नांवर त्यांनी केलेल्या कामाची ही पावती असल्याचे मानले जात आहे.
विजयानंतर बोलताना रोहिणी चिमटे यांनी मतदारांचे आभार मानत,“ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दाखवलेला विश्वास व मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होते. हा विजय केवळ माझा नसून प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा आहे. दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करणार,” असे सांगितले.
त्यांच्या या विक्रमी विजयामुळे भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासाची गती आणखी वेगाने पुढे जाईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.























