सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलने करा, एकामागे एक राजीनामे मागण्यासाठी नको’ केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे कॉक्रोच जनता पक्षाला आवाहन

पुणे, प्रतिनिधी : लोकशाही राज्यपद्धतीमध्ये आंदोलने करण्याचा आणि आपल्या मागण्या मांडण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. मात्र, समाजाच्या आणि नागरिकांच्या प्रश्नांवर जरूर आंदोलने करा. एकापाठोपाठ एक राजीनामे यांच्या मागणीसाठी आंदोलने करून आपले बळ वाया घालवू नका, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉक्रोच जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

यावेळी शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, अण्णा वायदंडे, ब्राह्मण आघाडीचे ॲड. मंदार जोशी, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, नगरसेवक निलेश आल्हट, ॲड. हुलगेश चलवादी, बसवराज गायकवाड, मोहन जगताप, विशाल शेवाळे, उमेश कांबळे, निलेश रोकडे, सुनील गवळी, मुश्ताक बाबर, श्रीकांत कदम, जयदेव रंधवे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या, महिलांच्या, वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या, भूमीहिनांच्या न्याय्य हक्कांसाठी जरूर आंदोलने करा. मात्र,, एकाचा राजीनामा घेण्यात यश मिळाल्यानंतर दुसऱ्याचा राजीनामा मागण्यासाठी नव्याने आंदोलने करू नका. विद्यार्थ्यांना अशा आंदोलनात उतरवणे ऐवजी विधायक कार्यक्रम आणि आपले भवितव्य घडवण्यासाठी, आर्थिक उन्नतीसाठी वेळ द्या, असा सल्ला आठवले यांनी कॉक्रोच जनता पक्षाला दिला.

सध्याच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुसंवाद शिल्लक राहिलेला नाही. वास्तविक सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामुळेच लोकशाहीला पूर्णत्व येते. दोघांनीही एकत्रितपणे काम करणे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. सरकारच्या चांगल्या कामांचे विरोधकांनी स्वागत केले पाहिजे. त्याचप्रमाणे विरोधकांनी आपल्या मागण्या आणि मते सत्ताधाऱ्यांसमोर संवादातून मांडली पाहिजेत. सत्ताधाऱ्यांनी ती समजून घेतली पाहिजे, असेही आठवले यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत उपस्थित राहत नाहीत, हा विरोधकांकडून केलेला आरोप निरर्थक असल्याचे आठवले यांनी सांगितले. शहा हे अत्यंत कार्यक्षम गृहमंत्री आहेत. सभागृहात ज्या मंत्राच्या विभागाशी संबंधित कामकाज होणार असते त्या मंत्र्यानेच उपस्थित राहणे अपेक्षित आहे. ही जबाबदारी अमित शहा यांच्याकडून काटेकोरपणे पार पाडली जात आहे. असे असतानाही त्यांच्यावर अनुपस्थितीचा आरोप करणे चुकीचे असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.

See also  हांडेवाडी नवले वस्ती रोड येथील काँक्रीट रोड खालील खडी वाहून गेल्याने रस्ता खचण्याची शक्यता, शिवसेनेची दुरुस्तीची मागणी

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनामाची मागणी करणेही चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांना वाढीव उत्पन्न मिळावे यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या गाड्या बंद पडाव्या यासाठी नाही. इथेनॉलमुळे गाड्यांमध्ये बिघाड होत असेल तर त्याबाबत काटेकोर तांत्रिक तपासणी करण्यात यावी व आवश्यकता वाटल्यास इथेनॉल मिसळण्याचा निर्णय मागे घ्यावा. त्या बाबीवरून गडकरी यांच्यासारख्या कार्यक्षम आणि धडाडीच्या मंत्र्यांचा राजीनामा मागणे साफ चुकीचे आहे, असे आठवले म्हणाले.

सध्या विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्या वाढत असतानाच दुसरीकडे आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी देखील आंदोलने होत आहेत. आरक्षण हा समाजातील वंचित घटकांचा हक्क आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भटके विमुक्त आणि आदिवासी समाजाला प्रथम आरक्षण मिळाले. मंडल आयोगाने इतर मागास प्रवर्गाला आरक्षण देण्याची शिफारस केली. ती अमलात आली. मराठा समाजाला ही आरक्षण मिळावे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. तसेच सवर्ण समाजातील ज्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांच्या आत आहे, अशा सर्वांनाही आरक्षण मिळावे अशी आपली मागणी आहे. आरक्षण हटाव ही मागणी घटना विरोधी आहे. त्यामुळे अशी मागणी करणाऱ्यांना थांबवणे गरजेचे आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

केंद्रात व राज्यात सरकार कोणतेही असले तरी नीट सारख्या परीक्षांमध्ये पेपर फुटी च प्रकार वारंवार घडले आहेत. केंद्र सरकारने परीक्षा पद्धती काटेकोर करण्यासाठी नवीन कायदा आणला आहे. मात्र, यासाठी केवळ कायदा करणे पुरेसे नाही तर कायद्याची कठोर अंमलबजावणी करणारी यंत्रणा तयार होणे अधिक गरजेचे आहे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया अशा शब्दात काँग्रेसने केलेली टीका अत्यंत अयोग्य असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. सुनेत्रा पवार या माझी ज्येष्ठ मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या कन्या आहेत. अजित पवारांच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्द त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना राजकारणाचा जाणगा अनुभव आहे. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निजानाच्या धक्क्यातून त्या अद्याप बाहेर आलेले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर केलेली ही टीका निंदनीय आहे, असे ते म्हणाले. एकेकाळी इंदिरा गांधी यांची देखील गुंगी गुडिया याच शब्दाने संभावना करण्यात आली. मात्र, पुढे जाऊन इंदिरा गांधी यांनी एक कणखर पंतप्रधान म्हणून आपली प्रतिमा सिद्ध केली, याची आठवणही आठवले यांनी करून दिली.

See also  प्रभाग क्रमांक 34 मध्ये भाजपा उमेदवारांचा एकतर्फी विजय; हरिदास चरवड, कोमल नवले, जयश्री भूमकर, राजू लायगुडे विजयी

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा आणि दहा वर्षाच्या चिमुकल्यांवर अत्याचाराची अत्यंत अमानुष घटना घडली आहे. पीडित कुटुंबाची आपण भेट घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना 51 हजारची मदत केली आहे. याशिवाय लवकरच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. अशा प्रकारच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समाजात वारंवार घडत असून त्या घडू नयेत यासाठी राजकीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि एकूण समाजानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली.