फुलगाव येथील सैनिक स्कूलचे क्रीडांगण बाधित करणारा रस्ता तत्काळ थांबवण्याची मागणी करत माजी आमदार दीपक पायगुडे यांचे विद्यार्थ्यांसाठी मध्यरात्री आंदोलन

पुणे : फुलगाव (सर्वे नं. २००/ब) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या हद्दीत सुरू असलेल्या रस्ता नूतनीकरणाच्या कामाबाबत आक्षेप नोंदवत ते काम तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत लोकसेवा प्रतिष्ठान, पुणेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सैनिक स्कूलच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे नूतनीकरण काम कोणतीही पूर्वसूचना किंवा संयुक्त मोजणी न करता सुरू करण्यात आले आहे. संबंधित जागा ही शाळेच्या भविष्यातील क्रिकेट मैदानाचा भाग असून त्याची लांबी व सीमारेषा तांत्रिक निकषांनुसार निश्चित करण्यात आली आहे.
रस्ता नूतनीकरणामुळे मैदानाच्या बाउंड्री डिस्टन्स आणि सेफ्टी मार्जिनसंदर्भातील तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच भविष्यात भूसंपादन किंवा अन्य वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर आणि क्रीडा उपक्रमांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नुसार संबंधित मालमत्तेची हद्द निश्चिती व संयुक्त मोजणी होण्यापूर्वी अशा प्रकारचे काम करणे नियमबाह्य असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित रस्ता नूतनीकरणाचे काम तात्काळ स्थगित करून महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि संस्थेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संयुक्त मोजणी करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान मध्यरात्री संस्थेची परवानगी न घेता काँक्रीट रस्त्याचे काम क्रीडांगणामधून सुरू करण्यात आले होते. ग्रामसेवक अधिकारी नसताना रात्री अचानक रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर माजी आमदार दीपक पायगुडे यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्याच्या कामामध्ये बसून आंदोलन सुरू केले.

See also  ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हचे पुण्यात प्रथमच आयोजनउद्योग-व्यवसाय विस्तार आणि परदेशी गुंतवणुकीच्या संधींविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन