पुणे : पुणेरी मेट्रोची प्रवासी सेवा सुरू होण्यापूर्वी प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो स्थानके आणि परिसराची संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेऊन प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पुणे वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, मुख्य दक्षता अधिकारी अमोल झेंडे, महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्यासह पीएमआरडीए आणि पीआयटीसीएमआरएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठ चौकातील जंक्शनचे डिझाइन, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाइन्स तसेच कृषी महाविद्यालय मेट्रो स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच सिमला चौक आणि संचेती चौकातील वाहतुकीची परिस्थिती तपासून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला.
मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचताना नागरिकांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक नियोजन प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिल्या.
मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करून वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पुणेकरांना मेट्रो प्रवासाचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असून, मेट्रो सेवेच्या प्रारंभाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.















