पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थिनींनी नवकल्पनांच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत नटराजन एम्पॉवरमेंट फाउंडेशन इनोव्हेशन अवॉर्ड्स २०२६ मध्ये विशेष गौरव प्राप्त केला. हा पुरस्कार एनईएफ आणि ग्लोबल टॅलेंट ट्रॅक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येतो.
एनईएफ इनोव्हेशन अवॉर्ड्स हे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ असून २०१२ पासून या उपक्रमांतर्गत देशभरातील विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि नवकल्पनांचा गौरव केला जात आहे. या उपक्रमाला पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मार्गदर्शन लाभले असून डॉ. गणेश नटराजन आणि डॉ. उमा गणेश यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पुढे नेला जात आहे.
हा विशेष सन्मान “आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड स्मार्ट एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम फॉर इलेक्ट्रिकल सबस्टेशन्स” या विद्यार्थिनींच्या प्रकल्पासाठी देण्यात आला. या प्रकल्पाची निर्मिती चेतना पाटील, रुचा कुलकर्णी, प्राची ठाकर आणि आर्या साने या विद्यार्थिनींच्या ऑल विमेन इनोव्हेटर्स टीमने केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनालिटिक्सच्या साहाय्याने वीज वापराचे निरीक्षण करणे, लोडमधील बदलांचा अंदाज लावणे, ऊर्जा हानी कमी करणे आणि वीज वितरण व्यवस्थेची विश्वसनीयता वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाला प्रा. डॉ. निलोफर मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभले.
या कामगिरीबद्दल संघाला विशेष गौरवपत्र, सन्मान चिन्ह आणि १०,००० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. हा सन्मान ग्लोबल टॅलेंट ट्रॅक फाउंडेशनच्या प्रिन्सिपल ट्रस्टी डॉ. उमा गणेश आणि डॉ. गणेश नटराजनयांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माहिती तंत्रज्ञान विभागातील पाच संघाची १००० पेक्षा अधिक महाविद्यालयांतील ३२,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ६००० पेक्षा अधिक अभिनव कल्पनांमधून निवड झाली.
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव म्हणाले, “ही कामगिरी आमच्या महाविद्यालयातील नवोपक्रमशीलता आणि उत्कृष्टतेची परंपरा दर्शवते. आमच्या विद्यार्थिनी संशोधन, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाच्या बळावर समाजातील समस्यांवर प्रभावी उपाय शोधत आहेत.”
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. दीपाली गोडसे यांनीही विद्यार्थिनींचे अभिनंदन करत सांगितले की, अशा राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठांमुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाय विकसित करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजातील वास्तविक समस्यांवर उपाय शोधण्याची दृष्टी तयार होते.
या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डॉ. अविनाश पवार, प्रा. मुग्धा राणे, प्रा. अश्विनी कानडे आणि प्रा. कमलेश पाटील उपस्थित होते.
भारती विद्यापीठ या पालक संस्थेच्या व्यवस्थापन मंडळातील मान्यवरांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव, उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थिनी, अंतिम फेरीसाठी निवड झालेले संघ आणि त्यांच्या प्रकल्प मार्गदर्शकांचे आणि माहिती तंत्रज्ञान (आय टी) विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयासह भारती विद्यापीठ या पालक संस्थेच्या नावाला गौरव प्राप्त झाला असून शैक्षणिक उत्कृष्टता आणि नवोपक्रम यांविषयी भारती विद्यापीठाची दृढ बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
या यशामुळे भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे हे तांत्रिक नवोपक्रमाचे केंद्र म्हणून अधिक बळकट झाले असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वास्तव समस्यांवर उपाय शोधणाऱ्या महिला अभियंत्यांचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. या सन्मानामुळे अधिकाधिक विद्यार्थी संशोधनाधारित नवकल्पनांकडे वळतील आणि शाश्वत अभियांत्रिकी उपाय विकसित करण्यासाठी प्रेरित होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
























