औषध निरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी युवक काँग्रेसचे महापालिकेवर आंदोलन; सखोल चौकशीची मागणी

पुणे, ता. २९ : पुणे महानगरपालिकेतील एमपीएससीमार्फत झालेल्या औषध निरीक्षक भरतीतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेवर आंदोलन केले. काँग्रेस भवन येथून महापालिकेकडे मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.

आंदोलनानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे म्हणाले, “या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. या घोटाळ्याबाबत दररोज नवी माहिती समोर येत आहे. औषध निरीक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित महापालिकेतील व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर सर्व संबंधितांची चौकशी करून त्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), आर्थिक व्यवहार तसेच परस्पर संबंधांची तपासणी करण्यात यावी. अनेक विद्यार्थी भीतीच्या वातावरणात सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आणत असून, त्या माहितीचीही पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तपास करावा.

या घोटाळ्याशी संबंधित क्लास चालक कोण आहेत, संपूर्ण रॅकेटचे नियंत्रण करणारी मुख्य व्यक्ती कोण आहे, तपासादरम्यान काही संबंधित व्यक्ती अचानक संपर्काबाहेर (Not Reachable) का होत आहेत, याचाही बारकाईने तपास होणे आवश्यक आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात यावे. तसेच पुणे महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.

या प्रकरणातील अनेक धागेदोरे आमच्यापर्यंत पोहोचत असून, तपास यंत्रणांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई केल्यास या घोटाळ्याचे आणखी अनेक पैलू समोर येऊ शकतात. योग्य वेळी या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती आणि धागेदोरे सार्वजनिक केले जातील,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे म्हणाले, “हजारो विद्यार्थी कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षा देत असतात. मात्र वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटी आणि भरती घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास ढासळत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी महानगरपालिका भरतीबाबतही तक्रारी केल्या असून त्याची गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे.”

See also  पुणे विद्यापीठात पाली भवन उभे राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी समाज कल्याण विभाग व विद्यापीठामध्ये करार

या आंदोलनात पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष उमेश पवार, भूषण रानभरे, उमेश कंधारे, प्रियांका चौधरी, गणेश उबाळे, विश्वजित जाधव, ओंकार मोरे, अभिषेक अवचार, महेश म्हेत्रे, दिलीपसिंग देशमुख, आकाश भोपळे, राहुल शिरसाट, स्वप्निल गायकवाड यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.