महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीचा निर्विवाद विजय : अध्यक्षपदी योगेश सोमण विजयी

पुणे : महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीने स्पष्ट वर्चस्व मिळवत विजय मिळवला आहे. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष ही तीनही प्रमुख पदे साहित्य संवर्धन आघाडीच्या उमेदवारांनी जिंकली आहेत.
अध्यक्षपदी योगेश सोमण यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत मिलिंद जोशी यांचा पराभव केला. सोमण यांना ५३६५ मते मिळाली, तर जोशी यांना ५३२० मते मिळाली. प्रमुख कार्यवाह पदासाठी स्वाती महाळंक यांनी ५४१४ मते मिळवत सुनीतराजे पवार (५२८५ मते) यांचा पराभव केला. कोषाध्यक्ष पदासाठी प्रदीप निफाडकर यांनी ५५३६ मते मिळवत विनोद कुलकर्णी (५१६८ मते) यांना मागे टाकले.

यावेळी स्थानिक कार्यवाह पदांसाठीही विविध उमेदवारांची निवड झाली. त्यामध्ये सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, नितीन संगमनेरकर (साहित्य संवर्धन) तसेच अंजली कुलकर्णी, माधव राजगुरू, आशुतोष जावडेकर (परिवर्तन उत्कर्ष) यांचा समावेश आहे.

या निवडणुकीत एकूण १०,९०१ मतदान झाले. त्यापैकी १०,७१३ मते वैध ठरली असून १८८ मते अवैध ठरली. या निकालानंतर साहित्य संवर्धन आघाडीच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला असून विजयी उमेदवारांवर साहित्य क्षेत्राच्या विकासासाठी प्रभावी काम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विजयी उमेदवारांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

See also  बाणेर मध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा