बाणेर मेट्रो स्टेशन वगळल्यास काळे झेंडे आंदोलन; नागरिकांचा इशारा ; ३ नोव्हेंबरला केवळ १७ स्थानकांवर मेट्रो सुरू करण्याच्या नियोजनाला विरोध; बाणेरकरांची स्टेशन सुरू करण्याची मागणी

बाणेर : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३ चा शुभारंभ ३ नोव्हेंबर २०२६ रोजी केवळ १७ स्थानकांपुरता करण्याच्या नियोजनाला बाणेरमधील नागरिक व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. बाणेर मेट्रो स्टेशन सुरू न करता मेट्रो सेवा सुरू केल्यास उद्घाटनाच्या दिवशी काळे झेंडे दाखवून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) हा मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला गेल्या अनेक वर्षांपासून विलंब होत असल्याने पुणेकरांसह हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मेट्रोच्या कामासाठी बाणेरमधील नागरिकांनी जमिनी दिल्या असून, गेल्या पाच वर्षांपासून धूळ, रस्त्यांचे खोदकाम आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन केला आहे. असे असतानाही बाणेर मेट्रो स्टेशनचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होण्याची शक्यता असून, आरबीआय, सिमला चौक, महाबळेश्वर चौक आणि बाणेर ही चार स्थानके वगळून मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. सर्वाधिक सहकार्य करणाऱ्या बाणेरला मेट्रो सेवेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बाणेर मेट्रो स्टेशनचे काम तातडीने पूर्ण करून पहिल्याच टप्प्यात ते सुरू करावे, स्टेशन अपूर्ण राहण्याची कारणे स्पष्ट करावीत आणि काम पूर्ण होण्याची अंतिम तारीख लेखी स्वरूपात जाहीर करावी, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत. बाणेर स्टेशन सुरू होण्यापूर्वी मेट्रोचे उद्घाटन करू नये, अशीही त्यांची भूमिका आहे.

प्रशासनाने बाणेर स्टेशन वगळून मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय कायम ठेवल्यास ३ नोव्हेंबर रोजी स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या सहभागातून काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.‌

सामाजिक कार्यकर्ते अमर लोंढे यांनी सांगितले की, प्रकल्प अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात येत आहे. पुणे पिंपरी व हिंजवडी परिसरातील नागरिकांसाठी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. हा प्रकल्प वेळेवर सुरू होणे आवश्यक आहे परंतु यातून बाणेर मधील महत्त्वाची स्टेशन वगळणे यामुळे मूळ वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही.

See also  आम आदमी पार्टी महाराष्ट्र युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी रविराज काळे यांची नियुक्ती