पुणे, प्रतिनिधी – महाळुंगे येथील किर्ती एलिगंट सोसायटीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) संदर्भातील गंभीर त्रुटींमुळे मोठा आरोग्यधोका निर्माण झाला असून, संतप्त रहिवाशांनी पुणे महानगरपालिका (PMC) आयुक्तांकडे तातडीची सामूहिक तक्रार दाखल केली आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रहिवाशांच्या निवेदनानुसार, गेल्या काही दिवसांपासून तसेच मागील अनेक वर्षांपासून अर्धवट किंवा अपूर्ण प्रक्रियेतून गेलेले सांडपाणी सोसायटी परिसरात तसेच आजूबाजूच्या रस्त्यांवर साचत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे दूषित पाणी वाहत राहून परिसरात साचण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सांडपाण्यामुळे संसर्गजन्य व जलजन्य आजारांचा धोका वाढला असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. तसेच डास व इतर कीटकांची वाढ झाल्यामुळे आरोग्यविषयक समस्या अधिक तीव्र होत आहेत. यापूर्वीही अनेक वेळा संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
दरम्यान, रहिवाशांनी मनपाकडे सांडपाण्याच्या मूळ स्रोताची तातडीने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, सोसायटी परिसरात येणारे दूषित पाणी तात्काळ थांबवावे, तसेच स्वच्छता, फॉगिंग आणि आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. भविष्यात ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात, असेही त्यांनी नमूद केले आहे.
ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अन्यथा पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान, मनपाच्या प्रतिसादाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.















