मुख्यमंत्री पदाची माळ पुण्यातील दादांच्या गळ्यात पडणार?

पुणे :- गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि मंत्री पदांची माध्यमात चर्चा आहे. कोण होणार मुख्यमंत्री आणि कोणाच्या गळ्यात पडणार मंत्री पदाची माळ याविषयी राजकीय विश्लेषक अनेक तर्क वितर्क लावत आहेत. अनेक ज्येष्ठ नवोदित आमदारांची नावं चर्चेत येत आहेत. पण कौन बनेगा मुख्यमंत्री या पदासाठी पुण्यातल्या दादांच्या नावाची चर्चा पुण्यातल्या कार्यकर्त्यांच्यात होताना दिसत आहे. विधानसभेच्या कोथरूड मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील सलग दुसऱ्यांदा किंगमेकर ठरले आहेत. चंद्रकांतदादांनी 1 लाख 12 हजार 41 इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत इतर उमेदवारांचा दारुण पराभव केला आहे. मागील पाच वर्षात कोथरूड मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे, राबविलेल्या सेवाभावी उपक्रमांमुळे कोथरूडमधील मतदारांनी आपला आमदार म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांची निवड केली आहे. 

यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली, हे सर्वश्रुत आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्रानं अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला. अशातच आवश्यकता होती ती अधिकाधिक आमदार निवडून आणण्याची. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यातील एकूण सात आमदार पिंपरी चिंचवड मधील तीन आमदार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सोबतच, पश्चिम महाराष्ट्र पिंजून पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून ते अनेक आमदारांच्या विजयाचे शिल्पकारही ठरले आहेत. अशातच, राज्याचा कारभार मतदार राजाने महायुतीच्या हाती सोपवला असताना मुख्यमंत्री पदाची माळ पुण्यातील कोणत्या दादांच्या गळ्यात पडणार? या प्रश्नाच्या उत्तराची प्रतिक्षा महाराष्ट्रवासी आतुरतेने करत आहेत.

पुण्याला मुख्यमंत्री पदाची गेले अनेक वर्षापासून प्रतीक्षा आहे ही प्रतीक्षा चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पुण्यामध्ये देखील याबाबत राजकीय वर्तुळात काहीशी सकारात्मकता आहे. राज्यभर मराठा आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता असताना मराठा उमेदवार मुख्यमंत्री व्हावा यासाठी महायुतीमध्ये प्रयत्न झाल्यास पुण्यातील चंद्रकांत दादा व अजित दादा यांचा विचार महायुतीमध्ये होऊ शकतो. भाजपा धक्का तंत्र देत असा निर्णय घेईल का याची प्रतीक्षा मात्र सध्या आहे. भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रभागी असले तरी मुख्यमंत्री पद व गृहमंत्री पद भाजपाकडे राहण्यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांना मुख्यमंत्री व फडणवीस यांना गृहमंत्री अशा पद्धतीची रचना होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. महायुती निवडणुकांमध्ये यशस्वी झाल्यानंतर गेले दोन आठवडे अद्यापही सरकार स्थापन होत नसल्याने अनेक चर्चा सामोरे येताना दिसत आहेत यामुळे राज्यात पुन्हा मुंबई, पुणे , ठाणे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा धक्का तंत्र वापरून काहीसा वेगळा निर्णय घेऊ शकते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

See also  मुळशी तालुक्यातील सुस परिसरात अवैध डोंगरफोड तर मुठा खोऱ्यात अवैध माती उत्खनन