बाणेर : बाणेर-बालेवाडी परिसरातील बालेवाडी सर्व्हिस रोडलगत सुरू असलेल्या कचरा डंपिंग ग्राऊंडला काल लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने धोकादायक कचरा डंपिंग ग्राऊंडविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांना निवेदन देण्यात आले व व कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी नागरिकांनी वाढते प्रदूषण, दुर्गंधी, वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना तसेच प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. हा प्रश्न तात्काळ आणि कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री तथा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
आंदोलनात भाजपा नगरसेविका रोहिणी चिमटे, भाजपा माजी सरचिटणीस गणेश कळमकर, मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर, भाजपा युवा मोर्चा संपर्कप्रमुख शिवम बालवडकर, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष अनिकेत चांदेरे, सरचिटणीस जागृती विचारे, उपाध्यक्ष राणी मोहिते आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही माहिती भाजपा युवा मोर्चाचे संपर्कप्रमुख शिवम बालवडकर यांनी दिली.
















