डॉ. शिवाजीराव कदम यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य निस्पृह आणि निस्वार्थ : राधाकृष्ण विखे पाटील

पुणे : भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी आयुष्यात अनेक वादळे आली तरी विचारांची खुणगाठ बांधून, भूमिकेवर ठाम राहून शिक्षण क्षेत्रात महनीय कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांची जडणघडण झाली आहे. डॉ. पतंगराव कदमरूपी वटवृक्षाच्या सावलीत राहून, समाजाप्रतीचे उत्तरदायित्व ओळखून, अहंपणा न बाळगता सर्वांना एकत्र घेऊन ते शिक्षण संस्थाचालक व परिवारप्रमुखाच्या नात्याने कार्यरत आहेत, अशा भावना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल्या.

भारती विद्यापीठाचे कुलपती, नामवंत संशोधक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व कुशल प्रशासक प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (दि. १४) भारती विद्यापीठातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. डॉ. कदम यांचा सत्कार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची प्रमुख उपस्थिती होती. भारती विद्यापीठाच्या शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, संस्थेचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, हेल्थ सायन्सच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे व डॉ. के. डी. जाधव मंचावर उपस्थित होते. गणेशमूर्ती, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते.

प्रा. मिलिंद जोशी संपादित ‘अमृतसंचय’ या डॉ. शिवाजीराव कदम गौरव विशेषांकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील बदल स्वीकारत निस्पृह आणि निस्वार्थ भावनेतून कार्य केले आहे, असे आवर्जून नमूद करून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘‘एखाद्या वृक्षाला सिंचन करून जोपासना केल्याप्रमाणे डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘सरकारी अनुदान घेण्याची सवय लागल्यामुळे एक नागरिक म्हणून आपण आपले उत्तरदायित्व विसरत चाललो आहोत. समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आज राजकीय व्यवस्था व संस्थाचालक अपयशी ठरत आहोत. अशावेळी सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून संस्थाचालक, प्राध्यापक व नागरिकांनी कार्यरत होणे आवश्यक आहे. यातून समाजाचा शेवटचा घटक ज्ञानमंदिरांकडे येण्यास प्रवृत्त केला जाईल.’’

See also  ८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण

मुरलीधर मोहळ म्हणाले, ‘‘डॉ. शिवाजीराव कदम यांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा नसून विचारांचा आणि संस्कारांचा सन्मान आहे. ते शिक्षण क्षेत्रात सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्याच्या भावनेतून सातत्याने कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक कार्यांतही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या दूरदृष्टीतून सुरुवात झालेल्या भारती विद्यापीठासारख्या शिक्षणसंस्थेला देशपातळीवर नेण्याचे कार्य डॉ. शिवाजीराव कदम यांनी केले आहे. कदम कुटुंबीय राजकीय पक्ष आणि विचारांच्या भिंतींपलीकडे जाऊन नाते निभावणारे आहेत.’’

सत्काराला उत्तर देताना डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘आज आयुष्याकडे मागे वळून बघताना माझे पाय मातीत असल्याचे जाणवते. हा माझा सन्मान नसून माझ्या हातून गेली ५० वर्षे घडत असलेल्या ज्ञानयज्ञाचा सन्मान आहे, असे मी मानतो.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘दुष्काळी भागात, मध्यमवर्गीय अशिक्षित शेतकरी पालकांच्या पोटी जन्म घेऊनही मला शिक्षणाची ओढ वाटली. यातूनच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेत कमवा व शिका योजनेतून शिक्षण घेतले. रयत शिक्षण संस्था माझी मायभूमी आणि कर्मभूमी आहे, याचे समाधान वाटते. बंधू डॉ. पतंगराव कदम यांच्या आशीर्वादाने मी शिक्षण पूर्ण करू शकलो. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी आयुष्यात कुठलीही तडजोड केली नाही. मी माणसांवर विश्वास ठेवून चालणारा श्रद्धाळू व्यक्ती असून माणसे हीच माझी शक्ती आहे.’’

सत्कार सोहळ्याच्या आयोजनाविषयी बोलताना डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, ‘‘हा सत्कार सोहळा भारती विद्यापीठाच्या परिवाराचा असला तरी माझ्यासाठी एक भावनात्मक प्रसंग आहे. भारती विद्यापीठाच्या उभारणीत डॉ. शिवाजीराव कदम यांनी मोठा हातभार लावला आहे. त्यांची हुशारी आणि शिक्षणाची ओढ ओळखून डॉ. पतंगराव कदम यांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. डॉ. शिवाजीराव कदम हे उत्तम प्रशासक आणि संशोधक आहेत, याविषयी अभिमान वाटतो.’’

प्रास्ताविकात प्रा. मिलिंद जोशी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत डॉ. पतंगराव कदम व डॉ. शिवाजीराव कदम यांच्यातील भावबंध उलगडले. मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी केले. आभार डॉ. अस्मिता जगताप यांनी मानले. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.