पुणे : राष्ट्रीय जनगणना २०२७ चे काम करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यासह जनगणना पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना स्वारगेट परिसरातील मिनाताई ठाकरे वसाहतीत घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, मारहाण, विनयभंग आणि चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील महिला कर्मचारी गेल्या १७ वर्षांपासून सेवेत कार्यरत असून त्यांच्याकडे राष्ट्रीय जनगणना २०२७ अंतर्गत प्रगणक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
दि. २७ मे रोजी दुपारी मिनाताई ठाकरे वसाहत, गल्ली क्रमांक १४ येथे माहिती संकलनासाठी गेल्यानंतर विकास मोरे यांच्या घरातील माहिती घेताना त्यांच्या पत्नी क्रांती मोरे यांनी माहिती देण्यास नकार देत महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी मदतीसाठी आलेले सहकारी प्रगणक धम्मानंद गायकवाड यांनाही दमदाटी करण्यात आली. त्यामुळे पथकाला काम अपूर्ण ठेवून माघारी फिरावे लागले.
यानंतर दि. २८ मे रोजी दुपारी जनगणनेचे काम पूर्ण करण्यासाठी पर्यवेक्षक रमेश जाधव, अतिश चव्हाण तसेच प्रगणक अक्षय बाबर, श्रीकांत गंवडर, आकाश वाघमारे आणि वैष्णवी शेंडगे यांचे पथक पुन्हा संबंधित ठिकाणी गेले होते. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव महिला कर्मचाऱ्यांचा मुलगाही सोबत होता. पथकाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी वाद घालत अचानक पथकावर हल्ला चढविला. विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, लिलावती मोरे, अभिजीत मोरे यांच्यासह अन्य ४ ते ५ जणांनी शासकीय कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या झटापटीदरम्यान मुख्य आरोपी विकास मोरे याने महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून त्यांच्या ब्लाऊजची बाही फाडत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मोबाईल फोन, फास्टट्रॅक घड्याळ आणि गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या मुलालाही गंभीर मारहाण करण्यात आली असून त्याच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेऊन जखमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर मनपा कर्मचाऱ्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण, विनयभंग आणि चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता जाधव करत आहेत. राष्ट्रीय महत्त्वाच्या जनगणना मोहिमेवर कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे पुणे महानगरपालिका कर्मचारी वर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
















