पुणे, दि. ८ ऑगस्ट २०२६ : पुण्यातील आगळ्या-वेगळ्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या निषेधाची परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शहरातील पाषाण-सुस रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या वतीने लावण्यात आलेले बॅनर्स सध्या लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनर्सच्या माध्यमातून सध्याच्या सरकारची तुलना महाभारतातील धृतराष्ट्राशी करण्यात आली असून, देशातील सद्यस्थितीवर सरकार मौन बाळगत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या बॅनर्समध्ये ‘महाभारत आणि आजचा भारत’ अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. एका बाजूला महाभारतातील द्रौपदीच्या वस्त्रहरणाचे चित्रण, तर दुसऱ्या बाजूला नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचे चित्रण करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांची सांगड घालत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना धृतराष्ट्राला परिस्थितीची माहिती असूनही त्याने मौन बाळगल्याचा दाखला देत, आज देशात विविध घटना घडत असताना सरकारदेखील त्याच पद्धतीने मौन बाळगत असल्याचा संदेश या बॅनर्समधून देण्यात आला आहे.
पाषाण-सुस रोड परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनर्समुळे नागरिकांचे लक्ष वेधले जात असून, पुण्यात पुन्हा एकदा ‘पुणेरी बॅनर’च्या माध्यमातून सरकारच्या कारभारावर उपरोधिक आणि प्रतीकात्मक पद्धतीने टीका करण्यात आली आहे.
सामाजिक आणि राजकीय विषयांवर पुण्यात बॅनर्सच्या माध्यमातून व्यक्त होणारी प्रतिक्रिया यापूर्वीही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे या नव्या बॅनर्सचीही शहरात चर्चा रंगली आहे.
















