पुणे : पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली आहे. संबंधित प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. निखिल वागळे यांच्याकडून पुण्यातील साने गुरुजी सभागृहात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला. विशेष म्हणजे भाजप कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या प्रयत्नातही होते. भाजप कार्यकर्ते सभागृहात जाऊन बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढली होती. तर कार्यकर्त्यांनी आपण विचार ऐकायला आलो असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शने दिली होती. त्यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातल्या खंडोजी बाबा चौकात निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांनी या हल्ल्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. हल्ला करणाऱ्यांनी निखिल वागळे यांच्या समर्थकांवर अंडे फेकल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.