नॉर्थ मेन रोड, हडपसर व खराडी-केशवनगर पुलाच्या कामांना गती
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या पाहणीनंतर अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश

हडपसर : पुणे शहरातील महत्त्वाच्या रस्ते व वाहतूक प्रकल्पांना गती देण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज विविध ठिकाणच्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच अडथळे दूर करून प्रकल्पांना गती देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

नॉर्थ मेन रोडवरील ABC फार्म चौक ते ताडीगुत्ता चौक या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची आयुक्त नवल किशोर राम यांनी पाहणी केली. रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या सेवावाहिन्या तातडीने स्थलांतरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करून रस्ता रुंदीकरणाचे काम शीघ्रतेने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यानंतर आयुक्तांनी हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्याची पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेली पावसाळी लाईन आणि ड्रेनेज लाईनची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, कोणताही अडथळा न येता काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि तज्ज्ञ सल्लागारांना देण्यात आल्या.

खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला वाहतुकीस खुला करण्याचे निर्देश
दरम्यान, खराडी-केशवनगर पुलाच्या कामाचीही आयुक्तांनी पाहणी केली. नागरिकांची व वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता हा पूल १५ ऑगस्ट २०२६ रोजी वाहतुकीस खुला करण्याबाबत मुख्य अभियंता (पथ) यांना निर्देश देण्यात आले.

पूल वाहतुकीस खुला केल्यानंतरही अॅप्रोच रोडची उर्वरित कामे सुरू राहणार असल्याने नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केले.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, प्रभारी मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर तसेच महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या रस्ते व पुलांच्या प्रकल्पांना गती देऊन नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने या कामांना प्राधान्य दिले आहे.

See also  पुणे ग्रामीण दक्षिणमधील नगरपरिषद निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी भाजपाच्या आंबेगाव पुणे येथे बैठका