आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद… हीच आमच्यासाठी खरी दिवाळी! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कोळवण येथे दिवाळीचा आनंदोत्सव

कोळवण, मुळशी : दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा उत्सव किंवा गोडधोड पदार्थांचा आनंद नव्हे, तर आपल्या आनंदात समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून घेण्याचा आणि माणुसकीची नाती अधिक घट्ट करण्याचा सण आहे. याच भावनेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कोळवण येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण मोठ्या आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर आदिवासी बांधवांना फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य, डोळ्यांतील आनंद आणि या छोट्याशा भेटीने त्यांच्या मनात निर्माण झालेली आपुलकी पाहून उपस्थित प्रत्येकाचे मन भारावून गेले.

हा केवळ फराळ वाटपाचा कार्यक्रम नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आनंद पोहोचवण्याचा, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि आपलेपणाची जाणीव करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

मुळशी तालुकाप्रमुख मा. सचिन खैरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी संपूर्ण मुळशी तालुक्यात हा सामाजिक उपक्रम राबविला जातो. राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपणे, गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला सणाच्या आनंदात सहभागी करून घेणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या प्रसंगी मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, ज्येष्ठ नेते नामदेव आप्पा टेमघरे, युवा नेते नितीन साठे, मुकेश लोयरे, सचिन सावंत, किशोर गायकवाड, दादा दहीभाते, पंकज धिडे, रवी टेमघरे, नितीन लोयरे, सखाराम वाघमारे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी व्यक्त करण्यात आलेली भावना एकच होती की, आपल्या घरातील दिवाळी तेव्हाच खऱ्या अर्थाने उजळते, जेव्हा आपल्या आनंदाचा प्रकाश दुसऱ्याच्या आयुष्यातही पोहोचतो. आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्या ओठांवरील हसू हेच या दिवाळीचे सर्वात मोठे समाधान आहे.

“मला केवळ दिवाळी साजरी करायची नाही, तर माझ्या मुळशीतील प्रत्येक बांधवाच्या आयुष्यात आनंदाचा एक दिवा पेटवायचा आहे. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे, हीच माझी खरी सामाजिक बांधिलकी आहे.” अशी भावना मुळशी तालुकाप्रमुख सचिन खैरे यांनी व्यक्त केली.

See also  बाणेर पोलीस स्टेशन मध्ये मोफत कर्करोग आरोग्य तपासणी शिबिर