म्हाळुंगे-नांदे रस्ता लवकरच पूर्ण होणार; २४ मीटर रस्त्याचे काम तातडीने हाती घेणार

म्हाळुंगे : म्हाळुंगे-नांदे रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली असून, ३६ मीटर रुंदीच्या प्रस्तावित रस्त्यापैकी प्रायोगिक तत्त्वावर २४ मीटर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

म्हाळुंगे-नांदे रस्त्याची पाहणी नगरसेवक अमोल बालवडकर, पुणे मनपा पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उपअभियंता प्रदीप रंगदळे, शाखा अभियंता संदीप चाबुकस्वार तसेच संबंधित जागामालकांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी रस्त्याचे रखडलेले काम, जागा उपलब्धतेसह विविध तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर झालेल्या अपघातात एका ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत होती.

यासाठी संबंधित जागामालक आणि पुणे मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले. तसेच सहकारी नगरसेवक बाबुरावआप्पा चांदेरे यांच्या सहकार्याने आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रस्ता पूर्ण करण्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला पुणे मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर २४ मीटर रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून, या रस्त्यामुळे म्हाळुंगे-नांदे परिसरातील हजारो रहिवासी तसेच या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांची वाहतूक कोंडी आणि गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.

“नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत म्हाळुंगे-नांदे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला.

See also  मनसेचे शहर उपाध्यक्ष चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील यांचा कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश